नाशिक : राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांसाठी नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन समृद्धी महामार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, शेतकऱ्याची कर्जमाफी करता येत नाही, असा सवाल विरोधकांनी सरकारला विचारला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा नाशिकमध्ये पोहोचलीय. सकाळीच संघर्ष यात्रेतल्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर शरसंधान साधलं. लाथेनं ऐकायंच की बातेनं हे आता सरकारनं ठरवावं, असा इशाराच विरोधकांनी दिला.


तर सरकारकडे समृद्धी महामार्गासाठी कोट्यवधी रुपये आहेत. कर्जमाफीसाठी मात्र पैसे नाहीत, अशी टीका सुनील तटकरेंनी केली. 
दरम्यान, दुस-या टप्प्यातली ही संघर्ष यात्रा आता अंतिम टप्प्यात आहे. तरीही नारायण राणे मात्र त्यात सहभागी झालेले नाहीत. 


माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील, जोगेद्र कवाडे, अबू आजमी यांच्यासह सर्व विरोधक एकत्रपणे यामध्ये सहभागी झाले आहेत. 



राणे पितापुत्र मात्र यात्रेपासून दूर आहेत. राणेंच्या अहमदाबादवारीनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दलच्या चर्चांना उधाण आलंयं. त्या पार्श्वभूमीवर राणेंचं यात्रेत सहभागी न होणं लक्षणीय मानले जात आहे.