शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : वाढत्या उन्हाचा सर्वाधीक फटका वन्यजीवांना बसू लागलाय. जंगलामध्ये अन्न आणि पाण्याची भीषण टंचाई झाल्यामुळे अनेक वन्यजीव गावाकडे मोर्चा वळवू लागलेत. असंच एक चुकार पाडस शिवारात सापडलं. मात्र शेतकऱ्याच्या सतर्कतेनं त्याचे प्राण वाचले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कळपातून भरकटलंलं हे हरणाचं गोजरं पाडस कामखेडा इथल्या दत्तात्रय पाटील यांच्या शेतात आलं होतं. मोकाट कुत्र्यांनी या पाडसाचा पाठलाग केला... मात्र बाळासाहेब पाटलांनी त्याला वाचवलं. त्यांनी पुतणे दत्तात्रय पाटील यांना बोलावून घेतलं... या हरणाच्या पाडसाचं करायचं काय? असा प्रश्न पाटील कुटुंबियांपुढे पडला. दत्तात्रय पाटील यांनी तातडीनं 'झी मीडिया'शी संपर्क साधला.


'झी मीडिया'च्या प्रतिनधींनी पाटील यांची भेट घेतली आणि तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वनविभागाचे अधिकारी तातडीनं कामखेड्यात पोहोचले. पंचनामा केला आणि पाडस ताब्यात घेतलं. अवघ्या 4 ते 5 दिवसाच्या या पाडसाला काही दिवस साखरा वन विभागाच्या विश्रामगृहात देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंडळ अधिकारी एम.व्ही. घोरपडे यांनी दिलीय.  


पाटील कुटुंबाच्या सतर्कतेनं या मुक्या जीवाचे प्राण वाचलेत. जंगलात पाण्याचं दुर्भीक्ष निर्माण झाल्यानं वन्यजीव गावाकडे येऊ लागलेत. त्यामुळे वनविभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे.