विहिरीत ४ दिवसापासून उपोषण, शेतकऱ्यासोबत आता बारावीचा विद्यार्थी
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भैरवनाथ जाधव यांच्या विहिरीत बसून सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भैरवनाथ जाधव यांच्या विहिरीत बसून सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. पतसंस्थेचे कर्ज माफ़ करावं आणि जप्तीची कारवाई थांबवावी या मागणीसाठी विहिरीत बसून आंदोलन करत आहे. आता त्यांच्या आंदोलनात परभणीतल्या बारावीच्या विद्यार्थ्यानंही उडी घेतलीय.
दत्ता नारायण रेंगे असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो पुण्यात बारावीचं शिक्षण घेत आहे. त्यानं काल रात्री थेट मन्याळे गांव गाठलं आणि विहिरीत उतरून ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. जाधव यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यन्त आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं दत्तानं सांगितलंय.
जाधव यांच्या आंदोलनाला भूमिपुत्र शेतकरी संघटनेने सुद्धा पाठिंबा देत संघटनेचे काही कार्यकर्ते आजपासून आंदोलनात सहभागी होणार आहेत. काल आंदोलनाच्या तिस-या दिवशी अकोल्याचे आमदार वैभव पिचड़, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी तहसीलदारां सह आन्दोलनस्थळी भेट देवून जाधवांना आंदोलन मांगे घेण्याची विनंती केली.