आळंदी : कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आळंदीमध्येही बंसीधर गिरे या शेतकऱ्याने सोमवारी आत्महत्या केली. मुळच्या परभणीच्या बन्सीलाल गिरे यांची जमीन सावकाराकडे गहाण होती. कर्जबाजारीपणामुळे ते आळंदीत आले. त्यांच्या मुलाला इथं नोकरी ही लागली. पण सावकारानं फोनवरून कर्जफेडीसाठी तगादा लावला. याला कंटाळून सोमवारी गिरे यांनी आत्महत्या केली.


आत्महत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आला. पण गिरे यांना मृत घोषित करण्यासाठी डॉक्टरांनी तब्बल ४ तास लावले. त्यानंतर पंचनामा करण्यासाठी आळंदी पोलीस तब्बल चार तासांनी पोहोचले. म्हणजे तब्बल ८ तास गिरे यांच्या मृतदेहाची अशी हेळसांड सुरु होती.