प्रफुल्ल पवार, अलिबाग : विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ आता कोकणातील शेतकरी, मच्छिमारसुद्धा सावकारी पाशात अडकत असल्याचे समोर आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा इथल्या जितेंद्र ज्वेलर्स नावाच्या सावकारी 'सुवर्णपेढी'वर पोलिसांनी धाड टाकलीय. या धाडीत पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलंय. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 2 कोटी 10 लाख रुपयांचे गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने ताब्यात घेतलंय. तसंच कोणतीही नोंद नसलेले 6 किलो सोनंही पोलिसांच्या हाती लागलंय. 


या पेढीचा मालक जयंतीलाल जैन याच्याकडे सावकारीचा वडिलोपार्जित परवाना आहे. इथले कोळी आणि शेतकरी आपल्याकडचे सोनं या सावकाराकडे गहाण ठेवून व्याजाने पैसे घेत असत. दिलेल्या रक्कमेवर चक्रवाढ व्याज लावून त्यांचे दागिने हडप करायचा. त्याच्या वागण्यामुळे इथले गरीब शेतकरी, कोळी त्रस्त झाले होते. त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी जयंतीलाल जैनसह खेमलाल आणि सचिन या मुलांविरोधात गुन्हा दाखल करुन धाड टाकली. 


ही घटना उघड झाल्यानंतर आता तरी पोलिसांसोबत सहकार विभागानेही हे प्रकरण गांभीर्याने घेऊन त्याची सखोल चौकशी करावी. तसंच सावकाराच्या जोखडातून पीडितांची मुक्तता करावी अशी मागणी होतेय.