कट्टर धार्मिकता नव्हे तर यापुढे कट्टर शेतकरीवाद पाहा - बच्चू कडू
देशामध्ये सध्या कट्टरतावाद चालू आहे, सगळ्यांनी आतापर्यंत धार्मिक कट्टरता पाहिली पण येत्या काळात कट्टर शेतकरीवाद पाहावयास मिळेल, असे आमदार बच्चू कडू यांनी आसूड यात्रे दरम्यान येवला येथे इशारा देताना स्पष्ट केले.
नाशिक : देशामध्ये सध्या कट्टरतावाद चालू आहे, सगळ्यांनी आतापर्यंत धार्मिक कट्टरता पाहिली पण येत्या काळात कट्टर शेतकरीवाद पाहावयास मिळेल, असे आमदार बच्चू कडू यांनी आसूड यात्रे दरम्यान येवला शहरातील विंचूर येथे इशारा देताना स्पष्ट केले.
येवला बाजार समिती आवारामध्ये दुपारी १ च्या कार्यक्रमास उशीर झाल्याने आमदार बच्चू कडू यांनी विंचूर चौफुलीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून चौफुलीवरच टेम्पोवर उभे राहून सभा घेतली. त्यावेळी शेतकरी प्रश्नाबाबत हा इशारा दिला.
यावेळी त्यांच्या समवेत शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील हे देखील होते. ११ एप्रिलपासून सुरु झालेली आसूड यात्रा २ दिवसात गुजरातमधील वडनगरला मोदींच्या गावात पोहचणार आहे. आमदार कडू यांनी या ठिकाणी १००० शेतकरी रक्तदान करून आमचे रक्त घ्या पण जीव घेऊ नका, असे मोदींना सांगणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी आमदार कडू यांनी सरकारने धोरणे बदलावे असे सांगत गेली ६० वर्षे कॉग्रेस, बीजेपी, शिवसेना या सगळ्यांनीच शेतकऱ्यांना लुटल्याचा आरोप करीत त्याचा हिशोब मागण्यासाठी ही यात्रा असल्याचे सांगितले.