पुणे : कात्रजमधील संतोषनगर भागात मंगळवारी पहाटे गणेश पार्क सोसायटीच्या पार्किंगमधील वाहनांना आग लावण्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोसायटीच्या पार्किंगमधील वाहनांना लावलेल्या आगीत १३ दुचाकी व ३ चारचाकी वाहने जळून खाक झाली होती. सीएनजी गॅसवर चालणारी व्हॅन रहिवाशांनी बाजूला काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. 


कात्रजसह सिंहगड अग्निशामक जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझविली होती. इमारतीतून बाहेर पडणारे दोघे जण किरकोळ जखमी झाले होते. दरम्यान, पोलिसांनी आज प्रणव धावडे या युवकाला अटक केली आहे.


मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पार्किंगमध्ये झालेला मोठा आवाज ऐकून सुरक्षारक्षक ज्ञानोबा डुकरे आवाजाच्या दिशेने धावले. ए विंग इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकी पेटल्याचे लक्षात आले. त्यांने अनेकांचे दरवाजे ठोठावून रहिवाशांना जागे केले. दरम्यान, पाठोपाठ दुचाकींच्या पेट्रोल टाक्‍यांचा स्फोट होऊन प्रचंड आग भडकली.