सिंधुदुर्ग : तारकर्लीसारखा अप्रतिम समुद्रकिनारा. तिथल्या स्कूबा डायव्हिंगमुळे समुद्राखालच्या जीवसृष्टीची नव्यानं  ओळख झाली.  पण आतापर्यंत स्कूबा डायव्हिंग ही तरुणांची मक्तेदारी होती, पण आता ती मोडीत निघतेय. तारकर्लीमधल्या अथांग समुद्रात भर्रकन सूर मारायचा. समुद्राच्या तळाशी जाऊन तिथली निळाई पाहायची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समुद्राच्या गाभ्यातला हा सुंदर ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा. या सगळ्यामध्ये स्कूबा डायव्हरची महत्त्वाची भूमिका. असे अनेक स्कूबा डायव्हर मालवणात आहेत. पण हर्षला मांजरेकर या तरुणीनं स्कूबा डायव्हिंगमध्ये उडी घेत करिअरची वेगळी वाट निवडलीय. सिंधुदुर्गात स्कूबा डायविंग सुरु झाल्यावर  थोड्याच काळात ते लोकप्रिय झालं.


देशविदेशातल्या पर्यटकांची पावलं इथे वळू लागली. त्यामुळे मालवणमधले बरेच तरुण स्कूबा डायव्हिंगककडे करिअर म्हणून पाहू लागले. मुली मात्र समुद्रतळाशी जायला धजावत नव्हत्या. पण हर्षलानं ते धाडस दाखवलं आणि ती आता तारकर्लीमधल्या स्कूबा डायविंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतेय. ती १०० फूट खोली पर्यंत डायविंग करते. 


सिंधुदुर्ग जिल्हा हा स्कूबा डायविंगमध्ये  भारतातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे. सिंधुदुर्गातील स्कूबा डायव्हिंग या उपक्रमामुळे पर्यटकांना कमीत कमी पैशामध्ये समुद्राखालील जीवन बघत येतंय. त्यामुळे भविष्यात स्कुबा डायविंग मध्ये व्यावसायिक संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. येथील  स्थानिकांना स्कुबा डायविंग चे प्रशिक्षण घेता यावं यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणातील तारकर्ली स्कूबा डायव्हिंग सेंटर उभारण्यात आलं.


यात स्कूबा डायव्हिंगच्या अभ्यासक्रमाला जो दोन लाख रुपयांचा खर्च येतो तो स्थानिक विद्यार्थ्यांसाठी पन्नास हजारावर आणण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक मछ्चिमार कुटुंबातल्या २० जणांची निवड करण्यात आली. त्यामध्ये हर्षलाचा समावेष आहे. समुद्राशी सलगी आणि लहानपणापासूनच  पोहण्याची आवड यामुळे हर्शलाचा इथपर्यंतचा प्रवास सोपा होता. हर्षलाच्या रुपानं कोकणाला पहिली महिला स्कूबा डायव्हर मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर मुलींसाठी नव्या करिअर वाटांसाठीची ही प्रेरणा ठरणार आहे.