विधान परिषद निवडणुकांचं चित्र अखेर स्पष्ट, पुण्यात होणार पंचरंगी लढत
विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे.
पुणे : विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे. पुण्यातल्या जागेसाठी दहापैकी पाच जणांनी निवडणूक अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे पुण्यातली ही लढत पंचरंगी होणार आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले, काँग्रेसचे संजय जगताप, भाजपचे अशोक येनपुरे, राष्ट्रवादीचे बंडखोर विलास लांडे आणि अपक्ष यशराज पारखी यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर विलास लांडे हे त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला गेले होते, पण विलास लांडेंना उशीर झाल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला नाही. लांडेंना उशीर झाला के ते जाणीवपूर्वक उशीरा आले याबाबत मात्र पुण्यात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. दरम्यान या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल भोसलेंना माझा पाठिंबा असल्याचं विलास लांडेंनी स्पष्ट केलं आहे.
19 नोव्हेंबरला विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी हे मतदान होणार आहे. यामध्ये पुणे, जळगाव, सांगली-सातारा, यवतमाळ, नांदेड आणि गोंदिया-भंडारा या जागांचा समावेश आहे.