महाडच्या पुरात पुलासोबत दोन एसटी बस वाहून गेल्याची भीती, २२ बेपत्ता
महाड एमआयडीसीजवळ पूल वाहून गेल्यानं दोन एसटी बसेस वाहून गेल्याची भीती व्यक्त होतेय.
रायगड : महाड एमआयडीसीजवळ पूल वाहून गेल्यानं दोन एसटी बसेस वाहून गेल्याची भीती व्यक्त होतेय.
पूल वाहून गेल्यानंतर आता बचावकार्य सुरू झालंय. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झालीय. तीन बोटींसह ही टीम आता वाहून गेलेल्या वाहनांचा शोध घेणार आहे.... बचावकार्यासाठी कोस्टगार्डचीही मदत घेतली जातेय.
जयगड-मुंबई आणि राजापूर-बोरीवली या दोन बस आहेत. त्यामध्ये एकूण चालक-वाहकसह २२ प्रवासी असल्याची माहिती मिळतेय.
पोलादपूरहून या दोन एसटी मुंबईच्या दिशेने निघाल्या. मात्र, त्या महाडला पोचल्याच नाहीत. रायगड पोलिसांकडून शोध मोहीम सुरु आहे.
एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहचली आहे. आणखी चार ते पाच वाहनही वाहून गेल्याची भीती व्यक्त होतेय.
पोलादपूर ते महाड हे १७ किलोमीटरचं अंतर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ राजेवाडी इथं सावित्री नदीवर ब्रिटीशकालीन हा पूल होता. या घटनेत इतरही वाहनं वाहून गेल्याची भीती व्यक्त होतेय.
संततधार पावसानं सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे पोलादपूर आणि महाड शहर जलमय झालंय. दरम्यान, पूल वाहून गेल्यानं मुंबईकडे येणारी वाहतूक कशेडी बायपासमार्गे वळवण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी दिलीय. मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झालीय.