मुंबई : फेसबुकच्या सहाय्याने ओळख झालेल्याने व्यक्तीने 64 वर्षीय महिलेस लग्नाचे अमिष दाखवून 94 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात घडलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी संबंधित महिलेने चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. या महिलेची हर्ले बेनसोन या व्यक्तीशी फेसबुकवरुन ओळख झाली. हळूहळू ही ओळख वाढत गेली. 


यावेळी त्या व्यक्तीने आपण लंडनमध्ये जॉब करत असल्याची खोटी माहिती पीडित महिलेला दिली. तसेच ओळख झाल्यानंतर त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तसेच भारतात आल्यावर लग्न करु असे आश्वासनही दिले. 


या आश्वासनाला पीडित महिला भुलली. महिलेच्या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने तिला आपली 95 हजार पौंड्सची बॅग कस्टम खात्याने ताब्यात घेतल्याचे सांगितले आणि ती सोडवण्यासाठी बँकेच्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले. 


पीडित महिलेनेही तात्काळ पाच लाख रुपये आरोपीच्या खात्यात जमा केले. त्यानंतर या ना त्या कारणावरुन आरोपी पीडित महिलेकडून विविध खात्यांद्वारे पैसे उकळत होता. त्याने तीन महिन्यांत तब्बल 94 लाख रुपयांचा गंडा त्या महिलेला घातला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे याप्रकऱणी तक्रार दाखल केली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.