अखिलेश हळवे, नागपूर : लग्न म्हणजे मोतीचूर लाडू... जो खातो तो पस्तावतो आणि न खातो तो ही पस्तावतो, असं गमतीनं म्हटलं जातं. मात्र, जिच्यासोबत साता जन्माच्या आणाभाका घेतल्या तिनं अवघ्या सात दिवसांत लाखोंचा गंडा घालून पोबारा केला तर...?


बडोद्याच्या राजीवची कथा... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमधल्या बडोद्याच्या राजीव पटेल यांच्यासाठी लग्न म्हणजे दुस्वप्न ठरलंय. ७ मार्च रोजी त्यांचा विवाह झाला... त्यानंतर त्यांच्या नववधूला बहीण खूप आजारी असल्याचा फोन आला. त्यामुळे पटेल तिला घेऊन नागपूरला गेले आणि अचानक त्यांची पत्नी गायब झाली. तोपर्यंत तिनं पटेल यांना 82 हजार रुपयांचा गंडा घातला होता. 


सोमनाथच्या पियुषची कथा...


पटेल यांच्या लग्नाच्या बरोबर आठ दिवस आधी, 27 फेब्रुवारीला गुजरातच्या सोमनाथ जिल्ह्यात पियुष वेरावेल यांचाही विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसांतच त्याच्या पत्नीला मावशी जखमी झाल्याचा फोन आला. पियुषही आपल्या पत्नीला घेऊन नागपूरला आले आणि त्यांचीही पत्नी गायब झाली. यावेळी पळवलेली रक्कम होती तब्बल 1 लाख 60 हजार रुपये... तिच्या नातलगांकडे चौकशी सुरू केल्यावर त्यांना धमकीचे फोन यायला लागले.


राजीव-पियुषच्या कथेतलं साम्य...  


विशेष म्हणजे, राजीव पटेल यांना गंडा घालणाऱ्या त्यांची तथाकथित पत्नी पियुष वेरावेल यांच्या लग्नात करवली होती... त्यामुळे ही एकच टोळी असल्याचं स्पष्ट झालंय. आता नागपुरच्या कळमना पोलिसांनी याचा तपास सुरू केला असून 3 पुरूष आणि 3 महिलांना अटक करण्यात आलीय. यात पियुष यांच्या पत्नीचा समावेश आहे, मात्र पेटल यांची पत्नी अद्याप फरार आहे.


गुजरात, राजस्थान, हरियाणासारख्या राज्यात मुलींचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे मुलांची लग्नच जमत नाहीत, अशी स्थिती आहे. याचा गैरफायदा हे असे ठकसेन घेतात. या टोळीची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत, हे येत्या काही काळात स्पष्ट होईलच. पण, अशा बनवा-बनवीच्या जाळ्यात आपण तर अडकत नाहीय ना, याची काळजी लग्न करताना घेतली पाहिजे.