पुण्यात गुंडांचा धुडगूस, हॉटेलात आलेल्या मुलींना मारहाण
शहरातील एक धक्कादायक घटना आता उजेडात आली आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर गणपतीची वर्गणी वसूल करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांनी कसा धुडगूस घातलाय, ते सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.
पुणे : शहरातील एक धक्कादायक घटना आता उजेडात आली आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर गणपतीची वर्गणी वसूल करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांनी कसा धुडगूस घातलाय, ते सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.
स्वतःला कार्यकर्ते म्हणवणाऱ्या या गुंडांनी हॉटेलात आलेल्या मुलींना मारहाण केल्याचं या सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात शनिवारी रात्री 17 सप्टेंबरला हा प्रकार घडला. मुलींना मारहाण करणारे गुंड हे पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचे भाजपचे नगरसेवक राजेश श्रीगिरी यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
तीन मुली मित्रांबरोबर हॉटेलच्या बाहेर पडत असताना दारूच्या नशेत असलेल्या या कार्यकर्त्यांनी त्यांना शिवीगाळ केली. छेडछाड केली आणि नंतर मारहाण देखील केली. कार्यकर्त्यांच्या मारहाणीत यातील एका मुलीच्या हाताला दुखापत झाली.
यावर कहर म्हणजे मुलींनी घडल्या प्रकाराबद्दल तक्रार करूनही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. उलट गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे.