नागपूर : नागपूर पोलिसांनी गांजा तस्करी करणा-या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सहा गांजा तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 कोटींपेक्षा जास्त किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. दोन वेगवेगळ्या कारवाईच्या अंतर्गत पोलिसांनी हे मादक पदार्थ जप्त केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर जिल्ह्यातील काटोल इथे वाळू नेणा-या टिप्परला अपघात झाला तेव्हा घटनास्थळावर तपासासाठी गेलेल्या पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली. वाळूच्या परतीखाली चक्क गांजा भरलेली पाकीटं लपवली होती. 


आंध्र आणि विशाखापट्टणम इथून नागपूरला वाळू आणणा-या टिप्परमध्ये हा साठा लपवला होता. नागपूर जिल्ह्याच्या चिखली मैना शिवारात 5 सप्टेंबरला हा अपघात झाला होता. या अपघातामुळे या तस्करी रॅकेटचं बिंग फुटलं आणि19 लाखांचा 190 किलोंचा गांजा जप्त करण्यात आला. 


तपासादरम्यान काटोल तालुक्याच्या मगरसूर गावात मनिष सिंह नावाच्या व्यक्तीच्या फार्म हाऊसमध्ये साठा करून ठेवल्याचं गुन्हे शाखेच्या पथकाच्या निदर्शनाला आलं. पोलिसांनी 7 सप्टेंबरला मगरसूर इथे छापा टाकून 1 कोटी 74 लाखांचा 1746 किलो गांजा पकडला. 


यानंतर मनिष सिंह, त्याचा नोकर रामशरण, निखिलेश बक्षी, नागुला सांभा शिवडू या चौघांना अटक केली. या टोळीचा प्रमुख नागुला हा आहे. त्याने त्रिमुर्तीनगर इथे मनिषसिंह आणि निखिलेश बक्षी यांच्यासह संगनमत करून नागपूर ग्रामीणला गांजा तस्करीचं हब बनवलं.


गेल्या अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू होता. तरीही केवळ अपघातानेच पोलिसांना याचा छडा लागला. आपल्या गुप्तचर यंत्रणेचं हे अपयश असल्याचं नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी मान्य केलं आहे.