प्रताप नाईक, कोल्हापूर : कोल्हापुरातून एक आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुलींचा टक्का वाढतोय. दर हजारी मुलांमागे 924 पर्यत मुलींचा जन्मदर वाढलाय. त्यामुळं वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा ही बुरसट मानसिकता बदलत चालल्याचं चित्र पहायला मिळतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलगी जन्मली तर ती ‘नकोशी’ अशा बुरसटलेल्या विचारांमुळे कोल्हापूर जिल्हा स्त्री-भ्रूणहत्येत आघाडीवर होता. त्यामुळं जिल्ह्याला स्री-भ्रूण हत्येत डेंजर झोनमध्ये टाकण्यात आलं होतं. 2001 मध्ये दर हजारी मुलांमागे कोल्हापूर जिल्हयात मुलीची संख्या 839 होती. मात्र, त्यानंतर जिल्ह्यात झालेल्या प्रबोधनामुळं आणि बदलत चाललेल्या मानसिकतेमुळं 2016 मध्ये ही संख्या 924वर पोहचलीय.


नृसिंहवाडीत राहणारा अजय कंदले आणि ज्योती कंदले यांना पाच वर्षीची परी आणि दोन वर्षाची भुमी या दोन गोंडस मुली आहेत. मुलगाच हवा ही मानसिकता बदलल्याचा आनंद आणि आपल्याला दोन मुली झाल्याचा अभिमान त्यांच्या चेह-यावर पाहायला मिळतोय.. 


अजय आणि ज्योतीसारखी अनेक कुंटुबीय कोल्हापूर जिल्ह्यात पहायला मिळतात. सावित्री खोचरेला तीन महिन्यापुर्वीचं सई ही पहिली मुलगी झाली. आपल्या पोटी मुलींचा जन्म झाला हा आनंद सावित्रीला सुखावणारा आहे. 


खालावलेला मुलींचा जन्मदर प्रबोधनासह बदलत्या मानसिकतेमुळे वाढलाय. सोनोग्राफी केंद्रांवर झालेली कारवाई, सरकारी आणि खासगी हॉस्पिटलांमधील कौन्सलिंग आणि पालकत्वाची बदलती मानसिकता यातून मुलीं च्याबाबतचा सकारात्मकबदल दिसून आलाय. शिक्षिका असलेल्या अलका अनुजे यांची मानसिकता पाहिल्यानंतर हे सहज शक्य होईल.


वंशाचा दिवा हवाच या हट्टापायी 2001 आणि त्यानंतर काही वर्ष गर्भातच कळ्या खुडल्या जात होत्या. मात्र आता परिस्थिती बदललीय. पन्हाळा तालुक्यात 2001मध्ये दर हजारी मुलांमागे 795 इतकी मुलींची संख्या होती. आता ती 903 वर जाऊन पोहचलीय. चंदगड तालुक्यात दर हजारी मुलांमागे 921 मुलींची संख्या होती. ती तब्बल 988 संख्येवर जाऊन पोहचलीय. शाहुवाडी तालुक्यात 2001 मध्ये दर हजारी मुलांमागे 827 मुलींची संख्या होती. ती 2016 मध्ये 945 वर गेलीय. आजरा तालुक्यात 926वर असणारी मुलींची संख्या 969 झालीय


दर हजारी मुलांमागे मुलींचा वाढलेला टक्का कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दिसुन येतो. मात्र, करवीर तालुक्यात अर्थात शहरी भागात मात्र हा आकडा अजुन 895 वरच आहे. यावरुन ग्रामीण भागातील भारताची मानसिकता मुलींच्याबाबत बदलली. मात्र, शहरी भागातील नागरिकंची मानसिकता तितक्या वेगानं बदलत नसल्याचं दिसून येतंय. जर शहरी भागातील नागरिकांची मानसिकता बदलली तर कोल्हापूर जिल्हा मुलींच्या जन्मदराबाबत भारतात नक्कीच आघाडीवर असेल.