मुंबई : पुण्या - मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही थोडी दिलासादायक बातमी ठरेल... मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवर बंद करण्यात आलेल्या चार लेन पैंकी दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-पुणे एक्‍सप्रेस-वेवर दरडी कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी संरक्षक जाळी बसवण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. त्यासाठी अमृतांजन पुलाजवळ दोन लेन बंद करण्यात आल्या होत्या... या दोन लेनवरचं काम पूर्ण झालं असून लवकरच त्या वाहतुकीसाठी खुल्या होणार आहेत.  


राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माहितीनुसार, गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळी बसवण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी आडोशी येथे मुंबईच्या दिशेने एक मार्गिका, अमृतांजन पूल- राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पुण्याच्या दिशेने एक मार्गिका, एक्‍स्प्रेस-वेवर मुंबईच्या दिशेने एक मार्गिका आणि खंडाळा बोगदा येथे मुंबईच्या दिशेने एक मार्गिका अशा चार मार्गिका बंद करण्यात आल्या होत्या. त्यापैकी अमृतांजन पुलाजवळ दोन मार्गिका २२ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आल्या. 


या ठिकाणी संरक्षक जाळी बसवण्याचे काम स्पेनच्या 'मॅकाफेरी एन्व्हायर्न्मेंट सोल्युशन कंपनी'ला दिले होते. हे काम अंतिम टप्प्यात आलंय. वाहतूक पोलिसांनी एमएसआरडीसीला ११ मार्चपर्यंत मुदत दिलीय. दोन मार्गिकांवरील वाहतूक १२ मार्चपासून सुरू होणार आहे. अन्य दोन मार्गिकांबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.