मुंबई : मुंबईचा पहिला डॉन असलेल्या हाजी मस्तान याच्या पेडर रोड येथील आलिशान बंगल्याचा लिलाव होणार आहे. या बंगल्याची आजच्या बाजारभावाने किंमत अंदाजे ९० ते १०० कोटींच्या आसपास आहे. मात्र, या लिलावाला खो बसलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बंगल्याच्या मालकीवरुन हाजी मस्तानच्या तीन मुली, हाजी मस्तानचा राइट हँड असलेल्या अब्दुल करीमची मुले याच्यामध्ये वाद होता. पण, आता मात्र हाजीचा दत्तक पुत्र सुंदरने या वादात उडी घेऊन बंगल्याच्या लिलावात खो घातला आहे.


हाजी मस्तान हा कधीही गोळी न चालवणारा, कधीही ड्रग्ज आणि हत्यारांचे अवैध व्यवहार न करणारा तरी संपूर्ण मुंबईवर आपले वर्चस्व ठेवणारा कुप्रसिद्ध डॉन होता. त्याचा जास्तीत जास्त पैसा हा सोन्याच्या काळ्या बाजारातून आला होता. 'गरिबांचा रॉबिनहूड' अशीही त्याची ओळख होती.


हाजी मस्तानचा १९९४ साली मृत्यू झाला. आपल्या मृत्यूआधी त्याने आपला बंगला त्याच्या तीन लेकींना म्हणजेच कमरुनिस्सा, मेकरुनिस्सा आणि शमशाद तसेच आपला राइट हँड असलेल्या अब्दुल करीमची तीन मुलं शकील, समीर आणि रेहाना या तिघांना दिला. खरंतर करीमच्या मुलांचा यात केवळ ३० टक्केच वाटा होता.


पण, पुढे त्यांनी खोट्या पॉवर ऑफ अॅटर्नी मार्फत या बंगल्यावर ताबा मिळवला. त्यामुळे मस्तानच्या मुली त्याच्याविरोधात पोलिसात गेल्या. करीमच्या मुलांना पोलिसांनी अटकही केली होती. पुढे त्यांच्यात समेट होऊन हा बंगला विकून त्याचे हिस्से वाटून घेण्याचे ठरले.


आता या बंगल्याचा लिलाव होणार इतक्यातच हाजी मस्तानचा दत्तक पुत्र सुंदर मस्तान याने या बंगल्याच्या लिलावाला विरोध केला आहे. हा बंगला म्हणजे माझ्या वडिलांची आठवण असून त्याचा लिलाव होऊ देणार नाही, असे त्याचे म्हणणे आहे. या वादात आता तिसऱ्या पक्षाचा समावेश झाल्याने त्यात ट्विस्ट आली आहे.