रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुका चूरशीच्या होणार आहेत. निवडणुकीसाठी सगळे पक्ष तयारीला लागलेत. पाहूयात एक रिपोर्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि राजापूर नगर परिषद तर दापोली नगर पंचायतीची निवडणूक लवकरच होत आहे. मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप युती करून लढले होते. मात्र यावेळी दोन्ही पक्षांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. 


सद्यस्थितीत 2 नगर परिषद आघाडीकडे, एक मनसेकडे तर एक युतीकडे होती मात्र भाजप-शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे भाजपनं नगराध्यक्षपद आपल्याकडेच ठेवलंय. 


चिपळूण नगर परिषदेत एकूण 24 नगरसेवक आहेत. त्यात राष्ट्रवादीचे 12, काँग्रेसचे 3, शिवसेनेचे 4 तर शहरविकास आघाडीचे 5 नगरसेवक आहेत. चिपळूण नगरपरिषदेत राष्ट्रवादीमध्ये दोन गट पहायला मिळतात. रमेश कदम आणि भास्कर जाधव यांच्यात वाद आहेत. तर शिवसेनेचे आमदार सदानंद यांची प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागलीय. 


राजापूर नगर परिषदेत एकूण 17 नगरसेवक आहेत. त्यात काँग्रेसचे 10, राष्ट्रवादी 2, शिवसेनेचे 3 आणि भाजपचे 2 नगरसेवक आहेत. यावेळी भाजप-शिवसेना एकमेकांविरोधात लढणार असल्यामुळे आमदार राजन साळवींची प्रतिष्ठा पणाला लागलीय. गेल्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. 


खेड ही कोकणातली एकमेव नगर परिषद मनसेच्या ताब्यात आहे. याठिकाणी 17 पैकी 9 नगरसेवक मनसेचे आहेत. शिवसेनेचे 7 तर एक नगरसेवक राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे यंदा मनसे याठिकाणी आपली जागा राखणार का असा प्रश्न आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांची प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागलीय. 


रत्नागिरी नगर परिषदेत सध्या शिवसेनेचे 15, भाजपचे 8 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 नगरसेवक आहेत. तर रत्नागिरीमधली एकमेव नगर पंचायत म्हणजे दापोली नगर पंचायत. याठिकाणी राष्ट्रवादीचे 6, मनसेचे 3, शिवसेनेचे 4, भाजपचे 2 आणि काँग्रेसचा एक नगरसेवक आहे. 
  
शिवसेना-भाजप या निवडणुकीत वेगवेगळे लढणार असून आघाडीबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. पूर्वी एकत्र निवडणूक लढवणारे आता एकमेकांविरोधात उभे ठाकलेत तर पूर्वी आघाडी तोडणारे आता आघाडी करू पाहतायत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार एवढं नक्की.