लातूर : रात्रीपासून बरसलेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यामधल्या बहुतांश भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यामध्ये एकूण 30 जणं अडकले असल्याची माहिती मिळत आहे. या सगळ्यांचा रेस्क्यू ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदपूर तालुक्यातल्या तांबटसांगवी-मावलगाव इथल्या शिवारात एका झाडावर ८ शेतकरी अडकलेत. मन्याड नदीच्या पुराच्या पाण्यात हे शेतकरी अडकलेत. तर रेणापूरमधल्या रेणा नदीच्या पुरात एका पत्र्याच्या खोलीत दोन जण अडकून पडले आहेत. पद्माकर लोखंडे आणि प्रवीण लोखंडे अशी त्यांची नावं आहेत.


दुसरीकडे नांदेड जिल्ह्यामधल्या लोहा तालुक्यातल्या डोंगरगावात 15 जण पुरात अडकले आहेत. लिंबोटी धरण ओसंडून वाहू लागल्यानं, मन्याड नदिनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी हे पंधरा जण झाडावर चढून बसलेत.


पुराचं पाणी हजारो हेक्टर शेतीत घुसलं आहे. तर परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातील गळाटी नदीलाही पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठावरच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय. पुरामुळे चाटोरी, बोरगाव, कोनेरवाडी गावांचा संपर्क तुटलाय. चाटोरी माळेगाव रस्ता सध्या बंद आहे.