बच्चू कडूंविरोधात हेमा मालिनी कायदेशीर कारवाईच्या तयारीत
आमदार बच्चू कडूंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी या कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
मुंबई : आमदार बच्चू कडूंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी या कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. याबाबतचे संकेतच हेमा मालिनी यांनी दिले आहेत.
सुरुवातीला मी याकडे पब्लिसिटी स्टंट म्हणून दुर्लक्ष केलं. पण हे वक्तव्य चुकीचं असल्याचं माझ्या जवळच्या व्यक्तींनी सांगितल्यामुळे आता मी कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचं हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.
तणावग्रस्त शेतकरी दारू पितात आणि दारु पिण्याच्या सवयीच्या आहारी गेल्यानं ते आत्महत्या करतात, हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न बच्चू कडू करत होते. परंतु, आपलं म्हणणं मांडताना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं.
हेमामालिनी रोज दारू पितात, म्हणून त्यांनी काय आत्महत्या केली का?' असा सवाल त्यांनी विचारला होता. पण वाद झाल्यानंतर मात्र बच्चू कडू यांनी सारवासारव केली. हेमा मालिनी चित्रपटामध्ये दारू पितात असं मला म्हणायचं होतं, असं कडू म्हणाले होते.