अकोल्यात आठ राजा-राणी निवडणुकीच्या रिंगणी...
राज्यात सध्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची धूम आहे. अनेक ठिकाणी ही निवडणूक गाजतेय ती नात्या-गोत्यांनी.. अकोल्यात तब्बल आठ दांपत्य निवडणूक रिंगणात आहेत. तर दोन माय-लेकांच्या जोड्याही सोबत निवडणूक लढतायेत.
जयेश जगड, झी मीडिया, अकोला : राज्यात सध्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची धूम आहे. अनेक ठिकाणी ही निवडणूक गाजतेय ती नात्या-गोत्यांनी.. अकोल्यात तब्बल आठ दांपत्य निवडणूक रिंगणात आहेत. तर दोन माय-लेकांच्या जोड्याही सोबत निवडणूक लढतायेत.
महापालिका निवडणुकीनं अकोल्यातलं वातावरण चांगलंच तापलंय.. अकोल्यात एक-दोन नव्हे तर तब्बल आठ पती-पत्नी नगरसेवक पदासाठी आपलं नशिब आजमावताहेत... त्यासोबतच आई आणि मुलाच्या दोन जोड्याही नगरसेवक होण्यासाठी सोबतच जोर लावत आहेत. अकोला महापालिकेला नात्यागोत्यांचं हे राजकारण काही नवं नाहीय. कारण, सध्याच्या महापालिकेत तीन पती-पत्नीच्या जोड्या नगरसेवक म्हणून निवडून आल्यात. त्यापैकी स्थायी समिती
सभापती विजय अग्रवाल आणि त्यांची पत्नी सुनिता यांना भाजपनं उमेदवारी दिलीय. याशिवाय संजय आणि माधुरी या विद्यमान नगरसेवक दांपत्याला भाजपनं परत रिंगणात उतरवलंय. शिवसेनेनं तर पती-पत्नींच्या तीन जोड्या रिंगणात उतरवल्यात.. यामध्ये पश्चिम शहरप्रमुख राजेश मिश्रा आणि त्यांची पत्नी अनिता यांना प्रभाग क्रमांक १७ मधून उमेदवारी मिळालीय. याशिवाय विद्यमान नगरसेवक राजेश काळे यांच्यासह त्यांची पत्नी अर्चना आणि नगरसेवक शरद तुरकर आणि त्यांची पत्नी वैशाली यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीनं जगजितसिंग आणि उषा विरक या दांपत्याला प्रभाग क्रमांक 12मधून उमेदवारी दिलीये.. सध्या अपक्ष नगरसेवक असलेले माजी उपमहापौर सुनिल मेश्राम आणि माधुरी मेश्राम प्रभाग क्रमांक सातमधून परत रिंगणात आहेत. याशिवाय प्रभाग क्रमांक आठमधून संजय आणि स्वाती तिकांडे हे दांपत्य रिंगणात उतरलेत.. संजय बडोणे हे गेल्या वीस वर्षांपासून अकोल्यात नगरसेवक आहेत. तर त्यांची पत्नी माधुरी यासुद्धा मागच्या निवडणूकीत अपक्ष म्हणून विजयी झाल्या होत्या. यावेळीही परत जोडीनेच सभाग्रूहात जाण्याचा आत्मविश्वास ते व्यक्त करतायेत.
सर्वांनाच उत्सुकता आहे.. या प्रभागात उषा आणि पंकज साबळे हे मायलेकं मनसेच्या उमेदवारीवर या प्रभागातून आपलं नशिब आजमावतायेत. एरव्ही एकट्यानं निवडणूक लढविणारे हे दोन्ही मायलेक यावेळी प्रथमच सोबत नगरसेवक होण्यासाठी आपलं नशिब आजमावतायेत.
प्रभाग क्रमांक १३ मध्येही राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक प्रशांत भारसाकळ आणि त्यांची आई करूणा आपलं नशिब आजमावतायेत. आता या आठ पती-पत्नी जोड्या आणि दोन मायलेकांच्या जोड्यांपैकी अकोलेकर कुणाच्या झोळीत नगरसेवकपद घालणार हे मतमोजणीनंतरच कळेल..
निवडणुकीच्या रिंगणातले कुटुंब
उमेदवार नातं पक्ष प्रभाग
विजय-सुनिता अग्रवाल पती-पत्नी भाजप ५ व १३
संजय-माधुरी बडोणे पती-पत्नी भाजप १९ व १६
राजेश-अनिता मिश्रा पती-पत्नी शिवसेना १७
राजेश-अर्चना काळे पती-पत्नी शिवसेना ९ व ८
शरद-वैशाली तूरकर पती-पत्नी शिवसेना २
जगजितसिंग-उषा विरक पती-पत्नी राष्ट्रवादी १२
सुनिल-माधुरी मेश्राम पती-पत्नी अपक्ष ७
संजय-स्वाती तिकांडे पती-पत्नी अपक्ष ८