जमिनीत सापडल्या ६ पिशव्या, गर्भपात केल्याचा संशय
सांगलीत गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सांगली : सांगलीत गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीतल्या म्हैशाळ परिसरात हा सगळा प्रकार उघड झालाय. म्हैशाळ इथली जमीन जेसीबीने खोदण्यात आली, त्यावेळी जमिनीत 6 पुरलेल्या पिशव्या आढळल्या. या पिशव्यांमध्ये मृत अर्भक असल्याचा संशय व्यक्त होतोय.
पिशव्यात मृत अर्भक आहे का, ते किती महिन्याचे आहेत हे वैद्यकीय तपासणीनंतर उघड होणार आहे. याप्रकरणी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे संशयाच्या फे-यात आहे. या डॉक्टरचा एक साथीदार संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
तीन दिवसांपूर्वी स्वाती जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दोन मुलींनंतर तिसरी मुलगीच असल्याने पतीने पत्नीला गर्भपात करण्यासाठी म्हैशाळमध्ये आणलं होतं. या प्रकरणी या महिलेचा पती प्रविण जमदाडेला अटक करण्यात आली होती, तर डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सगळ्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना या पिशव्या सापडल्यात.