नागपूर : २२ एप्रिल पासून तूर डाळ खरेदी बंद केल्यापासून अजूनही नागपूर जिल्ह्यात सुमारे ५ हजार क्विंटल शेतकऱ्यांची तूर डाळ खरेदीविना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पडून आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापैकी नागपूरच्या कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ५०० क्विंटल तूर आहे. २२ तारखे पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी नोंद केलेली आहे त्यांची सर्व तूर सरकार खरेदी करणार असल्याचे घोषित करण्यात आले मात्र या तुरीचा पंचनामा करण्यास अजूनही सुरवात झालेली नाही. सुरवातीला बारदाना नाही आणि आता पंचनामा करण्यास सुरवात न झाल्याने शेतकऱ्यांची तूर बाजारात तशीच पडून आहे.


वर्ध्यात शेतकऱ्यांना ५० कोटींचा तोटा 


शासकीय तूर खरेदीच्या संथ कारभाराचा फटका वर्धा जिल्ह्यातील शेतक-यांना ५० कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. वाढलेल्या मुदतीचा फायदा शेतकऱ्यांना झालाच नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी नाईलाजाने आपली तूर व्यपाऱ्यांना कमी दरामध्ये विकली. 


व्यापाऱ्यांनी लिलावातून तुरीला ३२०० ते ४२०० रुपयाचा भाव दिला आहे. सरासरी ३७०० रुपये भावाप्रमाणे १३५० रुपये प्रति क्विंटल इतका तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागलाय  .सरकारी खरेदीच्या दुप्पट व्यापाऱ्यांची तूर खरेदी होत असल्याने आमच्या तुरीचे काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.