जळगाव विधान परिषदेसाठी भाजपच्या चंदुलाल पटेलांसमोर अपक्षाचं आव्हान
जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता भाजप विरुद्ध अपक्ष अशी लढत रंगणार आहे.
जळगाव : जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता भाजप विरुद्ध अपक्ष अशी लढत रंगणार आहे. आज माघारीच्या दिवशी दिवसभरातील नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सह अन्य आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतले.
या निवडणुकीसाठी तब्बल २९ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते, त्यापैकी २१ उमेदवारांनी माघार घेतल्याने ७ अपक्षांसह भाजपचा एका उमेदवार रिंगणात आहे.
खरी लढत मात्र भाजपचे चंदुलाल पटेल आणि अपक्ष ऍड. विजय पाटील यांच्यात असणार आहे. त्यामुळे दुरंगी लढतीचे चित्र आता स्पष्ट झालं आहे.
विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवाराला तुल्यबळ आव्हान देणारे एकमेव उमेदवार माजी राज्यमंत्री तसेच राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांनीही निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने भाजप उमेदवार चंदुलाल पटेल यांच्याशी आता केवळ ऍड. विजय पाटील यांचा सामना होणार आहे. दरम्यान, शिवसेनेने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शविला आहे. अपक्ष उमेदवाराचे आव्हान असल्याने विजया सुकर झाल्याचा दावा भाजपने केला आहे.