बारवी धरण क्षेत्रातही आता जंगल सफारी
बदलापूर नजिकच्या बारवी धरण क्षेत्रात आता पर्यटकांना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. वन विभागाच्या पुढाकाराने बारवी धरणाच्या जंगल क्षेत्रात जंगल सफारी सुरु होत आहे.
चंद्रशेखर भुयार, बदलापूर : बदलापूर नजिकच्या बारवी धरण क्षेत्रात आता पर्यटकांना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. वन विभागाच्या पुढाकाराने बारवी धरणाच्या जंगल क्षेत्रात जंगल सफारी सुरु होत आहे.
मुंबईपासून अगदी जवळ बदलापूरपासून १६ किलोमीटर अंतरावर मुरबाड रोडवर बारवी धरण आहे. ७५० हेक्टरवरच्या या जंगल क्षेत्रात इको टुरीजम आकार घेत आहे. वन विभाग पर्यटकांना इथे जंगल सफारी घडवणार आहे. याकरता साडे तीन किलोमीटरची खास दगडमातीची पाऊलवाट तयार करण्यात आलीय.
जागोजागी पर्यटकांना विसावता यावं याकरता बैठक व्यवस्थाही करण्यात आलीय. शिवाय बांबूच्या सहाय्यानं तयार केलेलं निवारा शेडही पर्यटकांकरता विशेष आकर्षण असणार आहे. या ठिकाणी पर्यटकांच्या राहण्याची तसंच खाण्यापिण्याचीही व्यवस्था असणार आहे.
या जंगल सफरीत झाडाच्या पाराखाली बसून गप्पा मारता याव्यात याकरता वन विभागानं खास इकोफ्रेंडली पार तयार केले आहेत, अशी माहिती वनाधिकारी चंद्रकांत शेळके यांनी दिलीय.
गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून जंगल सफारी घडवण्यासाठी वन विभाग इथं काम करत आहे. यामुळे स्थानिक आदिवासींनाही रोजगार उपलब्ध होणार आहे. तेव्हा आता बारवी जंगल सफारी करायला सज्ज व्हा.