ज्योतिबा यात्रेला उत्साहात सुरुवात, अभिनेता हार्दिक जोशीचे ढोलवादन
श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेत मंगळवारी रात्री कोल्हापूरची महालक्ष्मी देवी भक्तांच्या भेटीसाठी बाहेर पडते. याला नगर प्रदक्षीणा असं म्हटलं जातं. ज्योतिबाला आलेल्या भक्तांना महालक्ष्मीचं दर्शन घेता यावं या उद्देशानं सुरु झालेली ही परंपरा आजही मोठ्या उत्साहात सुरु आहे. महालक्ष्मीचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
कोल्हापूर : श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेत मंगळवारी रात्री कोल्हापूरची महालक्ष्मी देवी भक्तांच्या भेटीसाठी बाहेर पडते. याला नगर प्रदक्षीणा असं म्हटलं जातं. ज्योतिबाला आलेल्या भक्तांना महालक्ष्मीचं दर्शन घेता यावं या उद्देशानं सुरु झालेली ही परंपरा आजही मोठ्या उत्साहात सुरु आहे. महालक्ष्मीचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
या रथोत्सवामध्ये 'तुझ्यात जीव रंगला' फेम राणा गायकवाड अर्थात अभिनेता हार्दिक जोशी याने ढोल वादन करुन रंगत आणली. दख्खनचा राजा अशी ख्याती असणा-या ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी राज्यासह आध्रप्रदेश, कर्नाटक,गोवा आणि गुजरातमधून लाखोंच्या संख्येनं भाविक येतात.
राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी 1914 साली महालक्ष्मी देवीची नगरप्रदक्षणा काढण्याची परंपरा सुरु केली. नगरप्रदक्षिणा मार्गावर फुलांच्या पायघड्या घालून रांगोळी काढण्यात आली होती. पारंपरिक वाद्याच्या गजरात पोलीस बॅन्ड आणि पुणेरी ढोलच्या निनादात नगरप्रदक्षिणेला सुरुवात झाली.
भक्तांनी महालक्ष्मी देवीवर फुलांची उधळण करत फटाक्यांची आतषबाजीही केली. दरम्यान, राणा अर्थात हार्दिक जोशी याला पाहाण्यासाठी मोठी गर्दी झाली. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तर रथोत्सवामध्ये हुल्लडबाजी करणा-याला नागरिकांनी मारहाण केली.