कुडाळ : सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायत निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. १७ एप्रिलला होणाऱ्या या निवडणुकीसाठी राणेंची काँग्रेस, केसरकर नाईकांची शिवसेना आणि कुडाळकरांची भाजप या तीन प्रमुख पक्षांचे वर्चस्व पणाला लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दत्ता सामंत यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता मात्र या निवडणुकीची रंगत वाढलीय. कुडाळ मतदारसंघ म्हणजे खरतर नारायण राणेंचा मतदारसंघ ही या मतदारसंघाची कालपर्यंत ओळख. पण लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेच्या निवडणुकीत तर राणेंच्या हातून कुडाळही निसटला.


शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे रिंगणात


राणेंच्या पराभवात आणि आमदार वैभव नाईकांच्या धनुष्यबाणाला याच कुडाळने तारले होते. आणि म्हणूनच आता कुडाळ नगरपंचायतीची होऊ घातलेली निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनलीय.
लोकसभा विधानसभेचे चित्रही पूर्ण पालटलंय आता  शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढतायत तर काँग्रेस-राष्ट्रवादीची युती आहे. त्यामुळे या निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.  


काँग्रेस आणि राष्ट्रीवादीचे अस्तित्व?


काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा गड खेचून आणायचाय, तर राष्ट्रवादीला अस्तित्व सांभाळायचे आहे. आमदार वैभव नाईकांवर होणाऱ्या एकाधिकारशाहीचा आरोपामुळे शिवसेना प्रचारात खंड पडतोय तर संपुर्ण शक्तीनिशी उतरलेल्या भाजपला सर्वच समीकरणं आपल्या फायद्याची वाटतायतं. 


१७ जागांसाठी होणा-या या निवडणुकीत काँग्रेस १५, राष्ट्रवादी २, शिवसेना १५ तर भाजप १४ जागा लढवतोय. सिंधुदुर्गात लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होणारेत. त्यामुळे कुडाळ नगरपंचायत निवडणूक ही त्या निवडणुकांची नांदी ठरणार आहे. त्यामुळे साहजिकच या दादा, काका, भाई, जीजींच्या निवडणुकीकडे कुडाळसह जिल्ह्याचही लक्ष लागून राहिलंय.