कल्याण-डोंबिवलीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे पुरते तीनतेरा
कल्याण-डोंबिवलीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे पुरते तीनतेरा वाजल्याचं सिद्ध करणाऱ्या घटना वारंवार घडतायत... पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न होत असताना चोरी, लुटमारीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच राहिला नसल्याचं या घटनांमुळे दिसत आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवलीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे पुरते तीनतेरा वाजल्याचं सिद्ध करणाऱ्या घटना वारंवार घडतायत... पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न होत असताना चोरी, लुटमारीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच राहिला नसल्याचं या घटनांमुळे दिसत आहे.
कल्याणमध्ये गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेनं पोलिसांचं किती भय राहिलंय ते दाखवून दिलंच आहे... भर गर्दीसमोर एका पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला होता... एका मंडळाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ही मुजोरी. तर अट्टल गुन्हेगारांना पोलिसांची काय तमा असणार?
स्वरा पाठक. मंगळवारी डोंबिवलीजवळ खमबाळपाडा भागात कॉलेजवरून परतत असताना बाईकवरून आलेल्या चोरट्याने तिला लुबाडण्याचा प्रयत्न केला. तिनं विरोध करताच ब्लेडनं हल्ला करण्यात आला. गेल्या काही दिवसांमध्ये अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.
कल्याण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी चौकात 4-5 जणांचं एक टोळकं दबा धरून बसलेलं असतं. एकटादुकटं सावज हेरलं जातं. धक्का लागला, मुलींची छेड काढली, अशा कोणत्याही कारणाने त्याला आडबाजुला नेले जाते आणि लुबाडलं जाते. आदित्य निमकर, सुभाष राऊत या तरुणांबाबत काही दिवसांपूर्वी हाच प्रकार घडला.
वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे महिला वर्गात, त्यातही कॉलेज तरुणींमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच राहिला नसल्यानं एकट्यानं कुठं जायची भीती वाटते, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांनी कारभार हाती घेतल्यापासून गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याची नागरिकांची भावना झाली आहे. पोलीस दलातूनही दबक्या आवाजात कुजबुज सुरू आहे. गुन्हेगारांबद्दल शिंदे यांची बोटचेपी भूमिका आश्चर्यकारक असल्याचं बोललं जात आहे.