मुंबई : महाड -पोलादपूर पूल दुर्घटनेनंतर पावसाची संततधार सुरुच असल्याने सावित्री नदीपात्रातील शोधमोहीमेत अडथळा येत आहे. त्यातच नदी पात्रात मगरींचा वापर होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. मगरींची दहशत यामुळे एनडीआरएफचे जवान त्रस्त झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवा-मुंबई महामार्गावरील महाड -पोलादपूर हा सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळला आणि मोठी दुर्घटना मंगळवारी घडली. दोन एसटी बसेस, काही खासगी वाहनांसह ४२ प्रवासी या महापुराचे बेपत्ता झालेत. यापैकी आतापर्यंत २४ मृतदेह सापडले आहेत. यातील २१ जणांची ओळख पटली आहे. मात्र, अन्य बेपत्ता लोकांचा आणि गाड्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरुच आहे.


‘एनडीआरएफ’चे पथक बुधवारपासून ही वाहने आणि प्रवासी यांना शोधण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. आतापर्यंत २४ मृतदेह हाती लागले आहेत, पण ते नदीपात्रात नव्हे तर घटनास्थळापासून ८० ते १०० कि.मी.वर समुद्रकिनारी. तीन दिवस उलटले तरी या दुर्घटनेतील वाहने काही सापडलेली नाहीत. पुराच्या पाण्यात वाहून गेलेले मृतदेह दूरवर हरिहरेश्‍वर, आंजर्ले, कुंबर्ली, दादली, वराठी, म्हाप्रळ येथे सापडले. 


दोन एसटी बसेस, एक तवेरा आणि एक होंडा सिटी कार ही दुर्घटनाग्रस्त वाहने नदीपात्रातील गाळातच रुतून बसली असावीत अशी दाट शक्यता असल्यानेच एनडीआरएफचे १६० जवान, १२ गोतेखोर आणि १३ बोटी गेल्या तीन दिवसांपासून नदीत शोध घेत आहे. मात्र, त्यांच्या हाती यश आलेले नाही.


यातच मगरीची दहशतही आहेच, असे या पथकाचे कमांडंट अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले. चिखलात घुसण्यासाठी आमच्याकडे इन्फ्रा रेड साधनेही नसल्याचे त्यांनी सांगितले.