महाड पूल दुर्घटना : दिवसभर शोधकार्य, हाती काहीही नाही
महाड पूल दुर्घटनेच्या मदतकार्यात अंधाराचा खंड पडला. NDRF आणि नौदलाच्या डायव्हर्सच्या मदतीने उद्या पहाटेपासून पुन्हा बचावकार्य सुरू होणार आहे.
मुंबई : कोणत्याही ठोस कामगिरीशिवाय महाड पूल दुर्घटनेच्या मदतकार्यात अंधाराचा खंड पडला. NDRF आणि नौदलाच्या डायव्हर्सच्या मदतीने उद्या पहाटेपासून पुन्हा बचावकार्य सुरू होणार आहे. ३०० किलो वजनाच्या लोहचुंबकाचीही मदत घेतली जाणार आहे.
महाडमधल्या सावित्री नदीतील बचावकार्य काळोख पडल्यामुळं थांबवण्यात आले आहे. नदीत बेपत्ता झालेल्या दोन एसटी बसेस शोधणा-या क्रेनही काढून घेण्यात आल्या आहेत. मात्र उद्या पहाटे हे शोधकार्य पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. एनडीआरएफच्या टीमसह नेव्ही आणि कोस्टगार्डच्या जवानांनीही युद्धपातळीवर बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला. मात्र प्रवाशांना शोधण्यात अपयश आलं. सापडलेले दोन मृतदेह महाडच्या दुर्घटनेतील नसल्याचं स्पष्ट झालंय. जिल्हाधिका-यांनी सकाळी दिलेली माहिती चुकीची असल्याचं पुढं आले आहे.
नदीला आलेला पूर आणि सततच्या पावसामुळं बचावकार्यात अडथळे येत होते. दोन्ही बसेसमध्ये तब्बल २२ प्रवासी असल्याची माहिती आहे. तसंच काही तवेरासारखी छोटी वाहनंही या पुलावरून जात असताना नदीत वाहून गेल्याची शक्यता आहे. त्यामुळं बेपत्ता प्रवाशांची संख्या वाढण्याची भीती आहे.
नौदलाची दोन आणि तटरक्षक दलाची दोन अशा चार हेलिकॉप्टरच्या मदतीनं हे बचावकार्य सुरू होतं. जवळपास १६० जवान १२ बोटींच्या मदतीनं हे कार्य सुरू होतं. नौदलाचे डायव्हर्सही बचावकार्यात सहभागी झालेत. वाहून गेलेल्या एसटी बसेसचा आंबेतच्या खाडीपर्यंत शोध घेतला गेला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीची पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाडमधल्या दुर्घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. महाडच्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्यातल्या सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी महाडमध्ये केली. मुख्यमंत्र्यांसोबत सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलही घटनास्थळी होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांकडून घटनेची माहिती घेऊन मदतकार्य़ासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.
राज्यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर
गेल्या ४ ते ५ दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी नद्यांना महापूर आलेत. काल नाशिक जिल्ह्यातल्या सर्व धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. काल पावसाने राज्यात ८ बळी घेतले.
औरंगाबादमध्ये पुरात ४०० लोक अडकले
तर काल महाबळेश्वर परिसरात झालेल्या प्रचंड पावसाने कोकणात महाडजवळून वाहणा-या सावित्री नदीला महापूर आलाय. या नदीवर असलेला मुंबई गोवा हायवेवरचा ब्रिटीशकालीन पूल रात्री वाहून गेला. त्यामुळे मोठा हाहाकार माजलाय. तर नाशिक जिल्ह्यात गोदावरीला आलेल्या पुरामुळे औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात सरला बेट, वांजर गांव परिसरात मोठा फटका बसलाय. नदी दुथडी भरून वाहत असल्याने या गावचा संपर्क तुटला आहे. या गावमध्ये ४०० लोक अडकले आहेत.
कोल्हापुरात धोक्याचा इशारा
दरम्यान पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे शिवाजी पूल पाणीपातळी ओसरेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणारेय... जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी यांनी ही माहिती दिलीय.
औरंगाबाद जिल्हा प्रशासनाचा संतापजनक प्रकार समोर आलाय. वैजापूर तालुक्यात एनडीआरएफच्या पथकाला पूरग्रस्त गावांमध्ये नेण्यासाठी एकही स्थानिक अधिकारी उपस्थित नसल्याचं समोर आलं. अखेर झी 24 तासच्या ट़ीमनं एनडीआरएफच्या पथकाला पूरग्रस्त गावात नेण्यासाठी मार्गदर्शन केलं.
यासंदर्भात जिल्हाधिकारी निधी पांडे यांना संपर्क साधला असता त्यांना संपर्क होऊ शकला नाही. तर वैजापूरचे तहसीलदार मनोहर गव्हा़ड यांना फोनवरून संपर्क साधला असता त्यांनीही प्रतिक्रिया न देताच फोन कापला. वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातल्या गावांमधील शेकडो नागरिक जीव मुठीत घेऊन अडकलेले असताना निगरगट्ट अधिकारी मात्र गायब झाले होते.
साताऱ्यात एक जण वाहून गेला
सातारा जिल्ह्यातल्या गोवे गावात नदीच्या पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून गेलाय. रवींद्र जाधव असं या तरुणाचं नाव आहे. कामानिमित्त शेजारच्या गावात गेलेला हा तरुण गावाला जोडलेल्या पुलावरून प्रवास करत होता. त्यावेळी अचानक कृष्णा नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला आणि पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. ही सगळी घटना कॅमे-यात कैद झाली आहे.
पुलावरून जाताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं रवींद्र परत जाण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला पलीकडे जाता येत नसल्यानं तो त्याच्या गोवे गावाकडील बाजूला वळाला आणि त्यातच त्याचा तोल जावून पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहून गेला. स्थानिक पातळीवरील यंत्रणा रविंद्रचा शोध घेत असून अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे अद्ययावत यंत्रणा मागविण्याची स्थानिकांची मागणी आहे.
पावसाच्या आणखी बातम्या....
- खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पुण्यातल्या अनेक भागांत पाणी शिरलंय. सिंहगड रोडवरच्या विठ्ठलनगर, अनंतनगर भागातल्या इमारती पुराच्या पाण्यानं वेढल्या गेल्या आहेत. महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन पथक या ठिकाणी दाखल झालं असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
- झी 24 तासच्या पुढाकारामुळे, नाशिकमधून नऊ जणांची पुराच्या तडाख्यातून सुखरुप सुटका झाली आहे. गोदावरीला आलेल्या पुरात नाशिक जिल्ह्यामधल्या सायखेडा गावातल्या प्राथमिक रुग्णालयात नऊ जण मंगळवारी रात्री अडकले. या सर्वांनी रूग्णालयाच्या गच्चीवर आश्रय घेतला होता.
- कोल्हापूर जिल्ह्यातील धरणक्षेत्रांत पावसाचा जोर वाढला असून राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
- नगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्याला गोदावरी नदीच्या पुराचा फटका बसलाय... तालुक्यातल्या डाऊच बुर्द्रुक कुरण इथल्या बेटावर 22 जण अडकलेत... त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत... बचाव कार्यासाठी आलेल्या एनडीआरएफच्या टीमनंही असमर्थता दाखवल्यानं कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी हेलीकॉप्टरची मागणी केलीये.
- गोदावरी नदीच्या पुरानं निफाड तालुक्यातल्या गोदाकाठची परिस्थिती गंभीर रुप धारण करतेय. तालुक्यातल्या कुरडगाव इथल्या गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या शेतातील घरात पाणी घुसल्यानं एक शेतकरी कालपासून अडकलाय.
- अकोल्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. आठवडाभर झालेल्या पावसानं जिल्ह्यातल्या जलाशयाच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झालीये. अकोला तालुक्यात सर्वाधिक 28.4 मिलीमीटर पाऊस झालाय.