भाजप सरकारमधील मंत्री जानकरांची जीभ घसरली
महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना पाठिंबा देताना मंत्री महादेव जानकरांची जीभ घसरली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी पातळी सोडून टीका केली.
भगवानगड : महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना पाठिंबा देताना मंत्री महादेव जानकरांची जीभ घसरली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी पातळी सोडून टीका केली.
यावेळी राजू शेट्टी आणि खोतांनी पंकजाला पाठिंबा दर्शवला. तर जानकरांनी मात्र उत्साहाच्या भरात बोलताना भान सोडलं. पक्षाने काही केले तरी आम्ही पाठीशी आहोत, असे आश्वासन खोत, जानकर यांनी पंकजांना दिले. बारामतीचे वाटोळं केल्याशिवाय शांत बसणार नाही. बारामतीची वाट लावणार आहे. बारामतीची सुपारी घेणाऱ्यांची वाट लावणार आहे. बारामतीचं वाटोळे केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा अजित पवार यांच्यावर घणाघात केला.
पंकजा मुंडे यांच्या आपण पाठीशी असल्याचे सांगताना जानकर म्हणाले, ताईंना एकटे पाडण्यात येत आहे. पंकजाताईंच्या बरोबर राष्ट्रीय समाज पक्ष आहे, हे सांगण्यासाठी इथे आलो आहे. आज पंकजाताईंचा विजय झाला आहे. शिवाय, मुंडेसाहेबांनी आम्हाला मोठं केले आहे. पंकजाताईंना कोणाच्या भिकेची गरज नाही, असेही यावेळी जानकर म्हणाले. यावेळी धनंजय मुंडे यांना चमचा म्हणून उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांचा चमचा आणि बारामतीचा एजंट असल्याचे म्हणले.
पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर जोरदार शक्तीप्रदर्शऩ केलं. सुमारे पाऊण तास केलेल्या भाषणात आपले चुलतबंधू आणि कट्टर विरोधक धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दांत त्यांनी तोफ डागली. महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत या आपल्या भावांना आपल्यामुळेच मंत्रीपदं मिळाली, असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला असला तरी थेट नेतृत्वाला आव्हान देण्याचं पंकजांनी टाळलं.
भगवानगडाच्या गादीबाबत आपल्याला आदर आहे आणि आता आपल्याला भाषण नाकारणारे महंतच पुढल्या वर्षी त्या गादीवरून आपल्याला आमंत्रण देतील, असं मुंडे म्हणाल्या. दरम्यान, भाषणापूर्वी हजारो समर्थकांसह पंकजा मुंडे भगवानगडावर दाखल झाल्या. त्यांच्यासोबत त्यांची बहीण खासदार प्रीतम मुंडेही होत्या. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत त्यांच्यासोबत आवर्जुन उपस्थित होते. पंकजा मुंडे गडावर जात असताना त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी केली.