तीन महापालिका निवडणुकांची उद्या मतमोजणी, उमेदवारांची धाकधूक वाढली
पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकांची मतमोजणी उद्या म्हणजेच शुक्रवारी होणार आहे.
मुंबई : पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकांची मतमोजणी उद्या म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. मतमोजणीला अवघे काही तासच बाकी राहिले असल्यामुळे उमेदवारांची धाकधूक आता वाढली आहे.
पनवेलमध्ये एकूण 55 टक्के मतदान झाले आहे. 20 प्रभागांमधील 78 जागांसाठी एकूण 418 उमेदवार रिंगणात आहेत. पनवेल महापालिकेसाठी भाजप आणि शेकापमध्ये जोरदार चुरस आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापसोबत महाआघाडी केली आहे. तर शिवसेना भाजपसोबत युती न करता स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेली आहे. त्यामुळे भाजपने आठवलेंच्या रिपाइंसोबत निवडणूक लढवली आहे.
तर भिवंडीमध्ये मतमोजणी प्रक्रियेत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मिल्लतनगर, भादवड, कामतघर, धोबीतलाव, कोंबडपाडा आदी ठिकाणच्या आठ निवडणूक केंद्रांवर मतमोजणी होणार आहे.
मालेगावमध्ये महापालिकेच्या 83 जागांसाठी 60 टक्के मतदान झालं असून 376 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झालंय. मालेगावमध्ये शिवसेना,भाजप काँग्रेस व एमआयएमनं स्वतंत्र निवडणूक लढवलीय. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दलाने आघाडी केली आहे.