धुळ्यात भव्य मूक मोर्चाचं आयोजन, कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
धुळ्यात बुधवारी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची तयारी आयोजकांनी पूर्ण केली असून, धुळ्याच्या मोर्च्यात दहा लाख समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिलीय.
धुळे : धुळ्यात बुधवारी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची तयारी आयोजकांनी पूर्ण केली असून, धुळ्याच्या मोर्च्यात दहा लाख समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिलीय.
या मोर्चासाठी सोशल मीडियामध्ये जोरदार प्रचार प्रसार मोहीम सुरु असल्याने मोर्चासाठी प्रचंड वातावरण निर्मिती करण्यात आली आहेत. या मूक मोर्चाला १७ पेक्षा अधिक संघटनांनी पाठिंबा दिला असून शेवटच्या क्षणापर्यंत समर्थनाची संख्या वाढत जाणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
मराठा क्रांती मोर्चाला प्रचंड गर्दी होणार असल्यानं पोलीस प्रशासनाने ही जय्यत तयारी केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह १५०० पोलीस कर्मचारी, ७०० होमगार्ड या मोर्चासाठी तैनात राहणार आहेत.
शहरात येणारी सर्व अवजड वाहतूक मोर्चा दरम्यान बंद करण्यात आली असून शहरात फक्त मोर्चासाठी आलेली वाहन आत सोडली जाणार आहेत. मोर्चा हा पारोळा रोडवरील शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघणार असून महानगर पालिकेकडून शिवतिर्थ चौकापर्यंत निघणार आहे. याच चौकात मोर्चाचा समारोप होणार आहे. या दरम्यान पोलीस प्रशासनाच्या कॅमेऱ्याची नजर मोर्चेकऱ्यांवर राहणार आहे.