पालघर : पालघर, माणगाव, सिंधुदुर्ग, वर्ध्यात मराठा क्रांती मूक मोर्चंचं आयोजन करण्यात आलंय. पालघर जीवन विकास हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असेल. या मोर्चात पालघर जिल्ह्यासह गुजरात राज्यातील मराठा समाज बांधव हजेरी लावणार असल्याचं बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगड जिल्‍हयातील माणगाव येथेही मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. अमित कॉम्प्लेक्सपासून सुरु होणा-या या मोर्चाची सांगता तहसिल कार्यालयाजवळ होईल. या मोर्चाला मराठा बांधव मोठ्या संख्येने हजेरी लावणार असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. त्‍यांच्‍या मदतीला 600 स्‍वयंसेवकांची फौज तैनात असेल. जिल्‍हयातील कुणबी आणि मुस्लिम समाजाने या मोर्चाला पाठिंबा दर्शवलाय.


हा मोर्चा निजामपूर रोड ते मुंबई गोवा महामार्गावरून माणगाव तहसिल कार्यालयाकडे जाणार आहे. त्यामुळं मोर्चाची गर्दी लक्षात घेता सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या वेळेत लोणेरे ते पोटनेर दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलीय. माणगाव तालुक्याच्या हद्दीतली किरकोळ वाहतूक निजामपूर-बोरवाडी फाटा-हरवंडी-कडापूर-ताम्हाणे-जांभूळपाडा ते ढालघर फाटा अशी वळवण्यात आलीय. मात्र यातून अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल तसचं अतिमहत्त्वाच्या व्य्क्तींची वाहनं वगळण्यात आली आहे.