सांस्कृतिक उपराजधानीतील मराठी शाळा केली बंद
महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या डोंबिवलीत मराठी माणसाला लाजिरवाणी अशी घटना घडली आहे.
डोंबिवली : महाराष्ट्राची सांस्कृतीक उपराजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या डोंबिवलीत मराठी माणसाला लाजिरवाणी अशी घटना घडली आहे. ती सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवल्याच्या एक महिन्याच्या आत. चक्क मराठी शाळाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षण प्रसारकर मंडळातर्फे चालविण्यात येणारी सिस्टर निवेदिता ही नावाजलेली शाळा बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. यामुळे धक्का बसलेल्या पालकांनी संतप्त होत थेट शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यलयावर धडक देत ठिय्या आंदोलन केले.
डोंबिवली पूर्वेतील सिस्टर निवेदिता या शाळेतील मराठी माध्यमाला विद्यार्थी कमी असल्याचं कारण देत ही शाळाच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकार कळताच संतप्त झालेल्या पालकांनी शाळा व्यवस्थापकांना घेराव घालण्याचा प्रकार केला.
व्यवस्थापनाने पालकांना आत न घेतल्याने पालकांनी तब्बल चार तास कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले. याबाबत संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांनीही स्पष्टपणे मराठी शाळा चालवणे परवडत नसल्याचं सांगितले.