शहीद राजेंद्र तुपारे यांच्यावर आज अंत्यसंस्कार
पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातील सुपूत्र राजेंद्र नारायण तुपारे धारातीर्थी पडले आहेत. राजेंद्र हे मूळचे चंदगड तालुक्यातील कार्वे या गावचे सुपुत्र आहेत. शत्रुशी लढताना वीरमरण आलेल्या राजेंद्र यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
कोल्हापूर : पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातील सुपूत्र राजेंद्र नारायण तुपारे धारातीर्थी पडले आहेत. राजेंद्र हे मूळचे चंदगड तालुक्यातील कार्वे या गावचे सुपुत्र आहेत. शत्रुशी लढताना वीरमरण आलेल्या राजेंद्र यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
जीवन अनिश्चित आहे. जीवनात संघर्ष आहे. जीवनात धोके आहेत. पण काही जिगरबाज असतात ते ध्येय निश्चित करुन पुढे जात राहतात. अशाच पैकी राजेंद्र होते. देशसेवेचा ध्यास आणि तळमळ त्यातूनच राजेंद्र यांनी बारावीनंतर सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला.
सधन कुटुंबातील राजेंद्र यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई-वडील आणि २ भाऊ १ बहिण असा परिवार आहे. आर्यन आणि वैभव अशी दोन्ही मुलांची नावं असून ते ९ आणि ५ वर्षाची आहेत. १३ वर्षापासून देशाची सेवा बजावणाऱ्या राजेंद्र यांना वीरमरण आलं. ही दुख:द बातमी कळताच गावावर आणि तुपारे कुटुंबावर शोककळा पसरलीये.
राजू या नावानंच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत त्यांची गावात ओळख होती. शाळेतील आठवणीने त्यांच्या शिक्षकांनाही गहिवरून आलं.....
राजेंद्र यांच्या कुटुंबाला सामाजिक कार्याचा वारसा आहे. त्यामुळं गावातील एक प्रतिष्ठेचं घर म्हणून तुपारेंच्या घराकडे पाहिलं जातंय. राजेंद्र हे रिटायर्ड झाल्यानंतर गावात शेती करणार होते. पण त्यांच हे स्वप्न अपुरंच राहिलंय..
सामाजिक कार्य असो किंवा खेळामध्ये राजेंद्र सर्वात पुढे असायचे. देशाच्या रक्षणासाठीही ते आघाडीवरच होते. पण हा जीवन प्रवास अर्ध्यावरच राहिला. देशासाठी बलिदान देत तरुणांना प्रेरणा देणारे राजेंद्र आठवणीतून जिवंत असणार आहेत.