विशाल करोळे, औरंगाबाद : औरंगाबादेत महापौर आणि उपमहापौर यांची ठरलेली टर्म संपलीय. शिवसेनेकडे महापौरपद तर भाजपकडे उपमहापौरपद आहे. आता महापौरपद भाजपला मिळणार आहे. त्यामुळेच की काय शिवसेना महापौरपद सोडायला तयार नाही, असं चित्र दिसतंय. मात्र भाजप आता शिवसेना राजीनामा देणारचं असं सागतंय, नक्की काय शिजतय शिवसेना भाजपमध्ये यावर चर्चा सुरू झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजपामध्ये नव्या राजकारणाची नांदी झालीय. शहराचं महापौरपद वादाचं कारण ठरू शकतं. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेला चार वर्ष आणि भाजपला एक वर्ष महापौरपदाचा फार्म्युला दोन्ही पक्षांमध्ये ठरला होता. त्यानुसार पहिलं दीड वर्ष शिवसेना त्यानंतर एक वर्ष भाजपा आणि शेवटचं दीड वर्ष पुन्हा शिवसेना असं सुरूवातीला ठरलं होतं. मात्र, त्यानंतर शिवसेनेनं आपला सूर बदलला. एक वर्षं द्यायचं ठरलंय, मात्र कोणतं एक वर्षं हे निश्चित नाही, असं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी म्हटलंय. 


दानवेंच्या या विधानामुळे भाजपा सावध झालाय. नगरपालिका निवडणुकांमध्ये युती, राज्यात युती आणि केंद्रातही युती असल्याची आठवण भाजपानं करून दिल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या पाच दिवसांत आता शिवसेनेचे महापौर राजीनामा देतील, असा दावा भाजपचे आमदार अतुल सावे यांनी केलाय.


भाजपाच्या या समजावणीनंतर सुरुवातीला ताठर असलेली शिवसेना काहीशी नरमल्याचं दिसतंय. मात्र सत्तापालट करण्याबाबत स्पष्ट बोलायला शिवसेना नेते अद्याप तयार नाहीत. जसजसा वेळ जातोय, तशी भाजपाच्या गोटामध्ये धाकधूक वाढलीय आणि इच्छुकांचे देव पाण्यात आहेत.