अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर  : नुकत्याच झालेल्या नगर पालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले असताना, दुसरीकडे मात्र विदर्भात एमआयएमने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भात एमआयएम तर्फे एकूण ३१ जागांवर उमेदवार लढले असताना, त्यापैकी तब्बल १८ जागांवर म्हणजे ५० % पेक्षा जास्त मतदार संघात पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. विदर्भात यशानंतर आता एमआयएमने संघभूमीवर आपले लक्ष केंद्रित केले असून त्या करता पक्ष नेते ओवेसी देखील मैदानात उतरणार आहेत. 


नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना मिळालेल्या यशाची चर्चा होत असताना, दुसरीकडे मात्र एमआयएम ला मिळालेल्या यशाचा फारसा उल्लेख होताना दिसत नाही. विदर्भातील या निवडणुकीत पक्षाने मोठ्या प्रमाणात मुसंडी मारली असून एकूण लढवलेल्या ३१ जागांपैकी १८ ठिकाणी पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यात देखील थोड्या फरकाने असेच चित्र आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नगर पालिकेच्या निवडणुकीत ८ जागांवर विजय मिळवत एमआयएम सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. प्रस्थापित पक्षांकडून मुस्लिम समाजाला मिळालेल्या निराशेमुळे मुस्लिम मतदार आता एमआयएम कडे आकृष्ट होत असल्याचा पक्षाच्या प्रवक्त्यांनी केला आहे. 


एमआयएम चा मतदार प्रामुख्याने मुस्लिम वर्ग असला तरीही आता इतर समाजाच्या मतदारांना आपण आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पक्षच्या स्थानिक नेत्यांनी म्हटले आहे. या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता पुढच्या वर्षी नागपूर जिल्ह्यातील नगर पालिका आणि नगर परिषद आणि त्या नंतर होणाऱ्या नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीकरता आपण तयारी करत असल्याचे सांगत या निवडणुकीच्या प्रचाराकरता पक्ष प्रमुख ओवेसी खुद्द येणार असल्याचे स्थानिक नेत्यांनीस सांगितले. विदर्भांत झालेल्या निवंडुकांकरता त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता आणि पक्षाला विजय मिळण्यामागे ते देखील महत्वाचे कारण असल्याचे या नेत्यांनी सांगितले. 


 विदर्भात यश मिळालेल्या नंतर आता संघ भूमीत प्रवेश मिळवण्याचा एमआयएम चा प्रयत्न आहे. आणि त्याकरता दलित समाजाला आपल्याकडे आकर्षित करणायचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या पर्यटनाला अकिती यश मिळते ते येत्या काळात कळेलच.