सिंधुदुर्ग : एरव्ही राजकीय पक्षांच्या धीरगंभीर चिंतन शिबिरांबाबत तुम्ही ऐकलं असेल. पण आंगणेवाडी जत्रेसाठी सिंधुदुर्गात दाखल झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांसाठी सध्या एक वेगळंच शिबीर सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्विमिंग सूट घातलेली ही मंडळी पाहिल्यावर प्रश्न पडेल ही जलतरण स्पर्धा आहे का? तर तसं नाही. हे सगळे मनसेचे पदाधिकारी आहेत. आंगणेवाडी जत्रेसाठी सुट्टीच्या मूडमध्ये आलेले. नेहमीच्या राजकीय ताणतणावातून थोडा विरंगुळा मिळावा यासाठी राज ठाकरेंनी त्यांना तारकर्लीला स्कूबा डायव्हिंगसाठी आणलंय. त्यात चिरंजीव अमित ठाकरेंचाही समावेश आहे.



स्कूबा डायव्हिंग म्हणजे साधं पोहणं नाही. त्यासाठी शास्त्रोक्त प्रशिक्षण आवश्यक असतं. तारकर्लीच्या स्कूबा डायव्हिग् इंस्टिट्यूटमधे मनसे पदाधिकारी हा थरार अनुभवतायत. दस्तुरखुद्द राज ठाकरेंनी स्वतः मात्र स्कूबा डायव्हिंगची मजा घेतली नाही. केवळ काठावर बसून ते अमित आणि इतरांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.


 मनसेच्या सभा, प्रचार रॅलींमध्ये सहभागी होणाऱ्या अमित ठाकरेंचं अजून राजकीय लाँचिंग झालेलं नाही. पण ट्रेनिंग मात्र जोरात सुरु आहे. अमित ठाकरेही हे ट्रेनिंग शिबीर एन्जॉय करतायत. आता स्कूबा डायव्हिंग शिकून मनसेचं इंजिन किती धावू शकेल, ते आताच सांगता येणार नाही. पण पक्षात जान आणण्यासाठी राज ठाकरे आणि त्यांचे  मनसेचे पदाधिकारी हातपाय हलवतायत, याचीच चर्चा सुरु आहे.