COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाशिम : मायलेकाचं नातं काही वेगळंच असतं... आपल्या पोटच्या गोळ्यासाठी वेळप्रसंगी कोणत्याही परिस्थितीला बेधडक सामोरं जाण्याचं धाडस, फक्त आईच दाखवू शकते, आणि याला प्राणीही अपवाद नाहीत. 


वाशिम जिल्ह्यातल्या कारंजालाड इथल्या स्टेट बँक चौकात त्याचंच ठळक उदाहरण पाहायला मिळालं. 


नेहमीच गजबजलेला असलेल्या या भागात मंगळवारी दुपारी, रस्त्याच्या कडेला वानराचं एक पिल्लू पडलं होतं. 


तिथून जात असलेल्या एका दूधविक्रेत्याचं त्या पिल्लाकडे लक्ष गेलं. त्या पिल्लाला त्यानं बाहेर काढलं आणि नंतर त्याला आपल्या सोबत घेऊन तो जाऊ लागला. 


मग मात्र तिथेच असलेल्या पिल्लाच्या आईनं आक्रमक पवित्रा घेतला. दूध विक्रेत्याला रोखण्याचा ती आपल्यापरीनं प्रयत्न करु लागली. 


मात्र कधी नुसत्याच हातानं, तर कधी दगड किंवा कधी काठी घेऊन, हा दूध विक्रेता तिला पिटाळून लावत होता. 


मात्र तरीही त्या पिल्लाची आई काही केल्या त्याला घाबरत नव्हती. तिच्यामुळे त्या दूध विक्रेत्याला धड पुढेही जाता येत नव्हतं. काही काळ हा प्रकार असाच सुरु राहिला. 


मग मात्र त्या ठिकाणी इतरही वानरं आली. आणि त्यांनी चारीबाजूंनी दूध विक्रेत्याला घेरलं. 


आता वानरांची ही टोळी या दूध विक्रेत्याच्या अंगावरच धाऊन जाऊ लागली. त्यामुळे त्याचा पुरता नाईलाज झाला. 


अखेर त्या पिल्लाला तिथेच सोडून तो दूध विक्रेता दूर गेला. आणि त्वरीत आपल्या पिल्लाला घेऊन ती आई आणि इतरही वानरं क्षणात पसार झाली. 


हा सारा प्रकार थोडाथोडका नाही तर तब्बल २० मिनिटं सुरु होता.