खासदार उदयनराजे भोसले संतापलेत, कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट...
खासदार उदयनराजे भोसलेंनीही आपल्या खास स्टाइलमध्ये या नव्या सेवेला विरोध केला आहे.
सातारा : महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटन स्थळांवर 'रेंट अ बाइक' म्हणजे भाड्याने दुचाकी देण्याची सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र स्थानिक टॅक्सीचालकांनी त्याला कडाडून विरोध केलाय. खासदार उदयनराजे भोसलेंनीही आपल्या खास स्टाइलमध्ये या नव्या सेवेला विरोध केला आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी नव्या व्यवसायाला त्यांच्या शैलीत विरोध केला आहे. गरीब टॅक्सी चालकांवर अन्याय होऊ देणार नाही. आणि… एक बार जब मैंने कमिटमेंट करदी, तो मैं अपने आपकी भी नहीं सुनता, असा डायलॉग मारत हिम्मत असेल तर रेंट अ बाईक सुरु करूनच दाखवा, असे आव्हान दिले.
परप्रांतीय उद्योगपतीने महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन पर्यटन स्थळावर दुचाकी भाडयाने देण्यासाठी परिवहन विभागाकडून परवाना मिळविला आहे. येत्या आठवड्यात ही सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने येथील स्थानिक टॅक्सी व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. टॅक्सी चालकांच्या संघटनांनी या नव्या व्यवसायाला कडाडून विरोध केलाय. याबाबत आज महाबळेशवरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत संघटनांनी मोर्चा काढला.
पर्यटकांसाठी येथे एसटी बस, टॅक्सी तसेच टुरिस्ट टॅक्सी हे पर्याय उपलब्ध आहेत. येथे साधारण सहाशे टॅक्सी असून अनेकांचे टॅक्सी हे एकमेव उदर निर्वाहाचे साधन आहे. येथे हंगामात मोठया प्रमाणावर गर्दी होते त्या दरम्यान सर्वांना रोजगार मिळतो. परंतु बिगर हंगामात येथे ठराविकच पर्यटक येतात त्यामुळे अनेक टॅक्सी चालकांना रोजगार मिळणे कठीण होते. पावसाळयातही या व्यवसायाला मोठया मंदीला सामोरे जावे लागते. तसेच टॅक्सी चालकांच्या संघटनांनी केलेला विरोध डावलून परिवहन विभागाने दुचाकी भाडयाने देण्यासाठी आवश्यक परवाना दिला आहे, त्यामुळे या दोन्ही शहरातील टॅक्सी व्यवसायिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केलाय.