सुट्टी नाकारली... दोन सहकाऱ्यांसोबत गरोदर पत्नीवरही झाडली गोळी!
गुहागरच्या रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर प्रोजेक्टमध्ये मंगळवारी रात्री सीआयएसएफच्या एका जवानाने आपल्या दोघा सहकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केलीय. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून हे अघोरी कृत्य केल्याची कबुली आरोपी जवानाने दिलीय.
प्रणव पोळेकर, गुहागर : गुहागरच्या रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर प्रोजेक्टमध्ये मंगळवारी रात्री सीआयएसएफच्या एका जवानाने आपल्या दोघा सहकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केलीय. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून हे अघोरी कृत्य केल्याची कबुली आरोपी जवानाने दिलीय.
'मैं डिपार्टमेंट से प्रताडीत हू... कोई नोकरीवाला आदमी ऐसा कदम नही उठाता... मेरी बाबी प्रेग्नंट है उसके इलाज के लिए नही भेजते... मैने खुदको गोली मारी है...' हे शब्द आहेत गोळीबार करणाऱ्या सीआयएसएफचा जवान हरिशकुमार गौडा याचे... आपण गोळीबार का केला याचा जणू कबुली जबाबच त्याने दिलाय.
ती घटना अंगाचा थरकाप उडवणारी होती. मंगळवारी रात्री रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर प्रोजेक्ट कंपनीचं आवार गोळीबाराच्या आवाजाने दणाणून गेलं होतं. या कंपनीत तैनात असलेला सीआयएसएफचा जवान हरिशकुमार गौड याने एएसआय बी. जी शिंदे यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून बी. रनीश हा कॉन्स्टेबल पुढे आला मात्र हरिशकुमारने त्यालाही गोळ्या घालून ठार केलं. हरिशकुमारने एकापाठोपाठ आपल्या दोन सहकाऱ्यांना ठार केलं होतं.
आरोपी हरिशकुमारला शांत करण्यासाठी त्याच्या पत्नीला तिथं आणण्यात आलं. मात्र हरिशकुमार गौडने स्वत:सह आपल्या पत्नीला बराकच्या बाथरूममध्ये कोंडवून घेतले. स्वत:वर गोळी झाडत असतानाच चुकून एक गोळी त्याच्या पत्नीला लागली... त्यानंतर हरिशकुमारनं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्नही केला.
जखमी हरिशकुमार आणि त्याच्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वरिष्ठांनी केलेल्या जाचामुळेच आपण हे कृत्य केल्याची कबुली हरिशकुमारने दिलीय.
गरोदर पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सुट्टी दिली जात नव्हती. सतत ड्यूटी बदलली जात होती. या विषय़ी वरिष्ठांकडे वारंवार तक्रार करुनही वरिष्ठांकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचं आरोपी हरिशने सांगितलंय. हे हत्याकांड खरंच या प्रकरातून घडलं असेल तर ते गंभर असून सीआयएसएफकडून याची गांभीर्याने दखल घेतील जाईल का? हाच खरा प्रश्न आहे.