मुंबई-नागपूर हायवे प्रकल्प सुस्साट!
मुंबई - नागपूर सुपर कम्युनिकेशन हायवे या मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने वेग घेतलाय.
मुंबई : मुंबई - नागपूर सुपर कम्युनिकेशन हायवे या मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने वेग घेतलाय.
पुढील महिन्यात या संपूर्ण प्रकल्पाच्या आराखड्याचं काम पूर्ण होऊन त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. विशेष म्हणजे, हा आठ पदरी भव्य महामार्ग असणार आहे.
रस्त्याच्या बाजूलाच समांतर रेल्वे मार्ग बांधण्यासाठी जागा सोडलेली असेल. यामुळे या मार्गावर रेल्वेचाही पर्याय उपलब्ध होईल. विशेष म्हणजे या मार्गावरील शेतमाल व फळे यांची वाहतूक जलद करण्यासाठी रेल्वे मार्गाचा पर्याय असणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे या मार्गाचा वापर करणाऱ्यांना टोल मात्र भरावा लागणार आहे. टोल आणि त्याच्या किंमतीचं स्वरूप हे प्रकल्प आराखडा अंतिम करताना स्पष्ट होईल.
हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढच्या आठवड्यात १८ मे रोजी लोकप्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलवली आहे. हा मार्ग ज्या ११ जिल्ह्यांतून जाणार आहे त्या जिल्ह्यातील आमदार आणि खासदार यांची बैठक घेतली जाणार आहे.