धुळे : अवघ्या चार तालुक्यांचा धुळे जिल्हा राज्यात छोटा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी या जिल्ह्यात राजकीय सरमिसळ प्रचंड आहे. कुठे काँग्रेस तर कुठे भाजपचा बोलबाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाही आपल्या ताकदीच्या जोरावर जिल्ह्यात दबदबा टिकवून आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जिल्ह्यात शिरपूर आणि दोंडाईचा नगरपालिकेच्या निवडणूक होणार आहेत. या पालिकांवर आज घडीला काँग्रेसचा जोर दिसत असला तरी भाजप इथं करिष्मा दाखवायला सज्ज आहे. 


धुळे जिल्ह्यातली राजकीय स्थिती मोठी विचित्र आहे. जिल्ह्यात शिवसेना नावालाच असताना इथं शिवसेनेचे दादा भुसे पालकमंत्री आहेत. शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावळ मंत्री असून त्यांना पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाही. त्यात काँग्रेसचे तुल्यबळ नेते आमदार अमरिश पटेल हे सत्तेबाहेर राहूनही सर्वपक्षीय विरोधकांना उरून पुरतात. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्येही आमदार पटेलांची पकड घट्ट आहे. त्यातच पटेल यांनी शिरपूरमधल्या महत्त्वाच्या साखर कारखान्याची आणि बाजार समितीची निवडणूक जिंकून आपला करिष्मा कायम ठेवलाय. 


त्यात त्यांनी जाणीवपूर्वक मराठा नेतृत्वाला संधी दिल्यानं शिरपूर पालिका निवडणुकीत आमदार पटेल पर्यायानं काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित आहे. भाजपनंही काँग्रेसला शह देण्यासाठी शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावळ यांना जोरदार रसद पुरवत मंत्रिपद दिलंय.  रावलांनीही शिंदखेड्यात आपली जादू कायम ठेवत दोंडाईचा बाजार समितीवर सत्तारुढ होत, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेला धोबीपछाड दिला आहे. 


केंद्रात डॉ. सुभाष भामरे आणि राज्यात रावल यांना संधी देऊन जिल्ह्यात पक्षवाढीचा मार्ग भाजपनं प्रशस्त केलाय. शिरपूर पालिकेत अमरिश पटेलांचा एकछत्री अंमल अशला तरी भाजप टफ फाईट देईल असा विश्वास स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना आहे.