अखिलेश हळवे, नागपूर : नोकरीसाठी अपडाऊन करणारे तुम्ही ऐकले असतील... पण घरफोड्या करण्यासाठी अपडाऊन करणाऱ्या दरोडेखोराच्या मुसक्या नागपूर पोलिसांनी आवळल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोज सकाळी घरातून निघायचं... बस, ट्रेन पकडून ऑफीसला जायचं... दिवसभर काम करून परत घरी परतायचं... हा चाकरमान्यांचा दिनक्रम तुम्ही ऐकला असेल... आता असा दिनक्रम अवलंबणारा एक घरफोड्याची कहाणी ऐका... 


सतीश उर्फ नानू धनराज पंचेश्वर हा मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातल्या तरोडी गावातून नागपूरला घरफोड्यांसाठी अप डाऊन करायचा. चोरीच्या उद्देशाने संध्याकाळी नागपुरात दाखल झालेला सतीश रस्त्यावर फिरून बंद आणि कुलूप लावलेल्या घरांची रेकी करायचा... सावज रुपी घर सापडलं की तिथे तो चोरीचं साहित्य लपवायचा. फावल्या वेळात हॉटेलमध्ये जेवायचा किंवा एखादा सिनेमा पाहायचा... मध्यरात्रीनंतर घरफोडी करायचा... आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्यांसोबत तो बाहेर पडायचा... नेहमीची बस पकडायचा आणि गावी परतायचा


सतीशने मधल्या काळात मित्राकडे त्याचा मोबाईल दिला होता. एक वर्ष बंद असलेला हा मोबाईल त्याच्या मित्राने सुरू केला तेव्हा चोराच्या मागावर असलेल्या पोलिसांना सुगावा लागला. आधी पोलिसांनी सतीशच्या मित्राला पकडला. त्यानंतर सतीश पोलिसांचा जाळ्यात सापडला. नागपूरमध्ये त्याने 16 घरफोड्या केल्या होत्या. तर भंडा-यात 10, अशी माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिलीय.  


नागपूरच्या प्रताप नगर पोलिसांनी त्याच्याकडू 9 तोळे सोनं आणि इतर मुद्देमाल जप्त केलाय. सतीश पंचेश्वरच्या चौकशीनंतर आणखीही काही चो-या आणि घरफोड्या उघड होण्याची शक्यता आहे.