नांदेड : नोटाबंदी बाबतच्या निर्णयानंतर देशभरात अर्थकल्लोळ सुरू झालाय. पण असेही काही लोक आहेत ज्यांच्यावर या बदलाचा काहीच परिणाम झाला नाही. कारण हजार आणि पाचशेच्या नोटांशी यांचा कधी संबधच आला नाही. पाहुयात आदिवासी पाड्यांचा हा स्पेशल रिपोर्ट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटाबदलीच्या निर्णयानंतर देशभरातील बॅंकासमोर रांगा लागल्या. पण जंगलात राहण्या-या मूळ आदिवासींच्या दैनंदिन व्यवहारात याचा कुठलाही परिणाम झाला नाही. आजही या आदिवासींचा बराचसा व्यवहार वस्तू विनिमय पद्धतीवर चालतो... नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात कोलाम जमातीच्या आदिवासी समुदायाचे अतिदूर्गम जंगलात 22 पाडे आहेत.


जंगलातील बांबू तोडून, त्याच्या टोपल्या बनवणे, लाकूड तोडून आणणे आणि शेतमजुरी ही आदिवास्यांची नियमित कामं. पाडयांजवळ्च्या मोठ्या बाजाराच्या गावात लाकूड आणि टोपल्या देऊन त्या बदल्यात शंभर दोनशे रुपये नाहीतर गहू, ज्वारी, तांदूळ, तेल, मीठ अशा जीवनाव्यश्यक वस्तू घेऊन हे आदिवासी आपला रोजचा उदरनिर्वाह चालवतात. 


शेतात मजुरी करणा-या महिला - पुरुषांना शंभर, दोनशे रुपये मजुरी मिळते. त्यामुळे या लोकांचा पाचशे आणि हजारांच्या नोटांशी संबंधच येत नाही. या पाडयांवरच्या अनेकांनी कधी पाचशे आणि हजार रुपयांची नोट पहिलीच नाही. जुन्या नोटा रद्द झाल्याची माहिती देखील अनेकांना नाही. बॅंकेत खातेच नसल्याने कधी या आदीवासींचा बॅंकांशी कधी संबंध आला नाही.


सध्या देशभरात नोटबदलीमुळे गोंधळ सुरू आहे... पण देशात काय चाललंय याची आदिवासींना माहितीच नाही. आजही आदिवासींचं जग, जगावेगळंच आहे.