नारायण राणेंचा ठाकरे बंधूंवर प्रहार
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नारायण राणेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नारायण राणेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेनं मराठा आरक्षणाला मनापासून पाठिंबा दिला नाही. मराठ्यांचे मोर्चे बघून शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली, म्हणून पाठिंबा देण्यात आल्याचं नारायण राणे म्हणालेत.
2013 साली राणे समिती स्थापन केली तेव्हा शिवसेनेनं आरक्षणाला पाठिंबा दिला नसल्याचा आरोप राणेंनी केला आहे. सामनातल्या व्यंगचित्रावरच्या वादावरूनही राणेंनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत आधी माफी मागायला तयार नव्हते, मराठ्यांचा रोष वाढल्यानं तसंच आमदारांनी राजीनामे देऊ केल्यानं माफी मागितल्याचं राणे म्हणाले.
सरकारनं त्वरित निर्णय घेतला नाही तर त्याचे जे पडसाद उमटतील याला सर्वस्वी मुख्यमंत्री आणि शिवसेना जबाबदार असेल असा इशाराही राणेंनी दिला आहे.
शिवसेनेबरोबरच राणेंनी मनसेवरही टीका केली आहे. शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले त्या पुरंदरेंना पाठिंबा देणा-या राज ठाकरेंकडून अपेक्षा नाही, अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली आहे. शिवसेना मनसे मराठ्यांमुळे वाढल्याचंही राणे म्हणाले आहेत.