नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं शहर सौंदर्यीकरणाचं स्वप्न औटघटकेचं ठरतं की काय अशी शंका उपस्थित होतेय. मनसेच्या काळात नाशिक शहरात ठिकठिकाणी वाहतूक बेटं उभारण्यात आली होती. मात्र ती आता वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. टप्प्याटप्प्याने वाहतूक बेटांच्या जागी सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमधून मनसेची सत्ता गेल्यावर आता राज ठाकरे यांच्या शहर सुशोभीकरणालाही ब्रेक लागणार आहे. पहिला हातोडा पडणार आहे शहरातील वाहतूक बेटांवर. निवडणुकीच्या तोंडावर काही खासगी कंपन्यांच्या मदतीने वाहतूक बेटं उभारली होती. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एबीबी सर्कल म्हणून ओळखलं जाणाऱ्या ठिकाणी योगाचा प्रसार करणारं सुंदर शिल्प उभारण्यात आलं होतं. मात्र अशी शहरातली ११ वाहतूक बेटं वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचं सांगत तोडण्यात येणार आहेत. 


एकूण 21 वाहतूक बेटांमुळे वाहतुकीला अडथळा होत आहे असा पोलिसांचा निष्कर्ष आहे. त्यातील ११ तोडण्यात येऊन तिथे सिग्नल उभारण्यात येणार आहेत. मात्र हे प्रस्ताव तयार करण्याचं काम मनसेच्या कार्यकाळातच सुरू होतं. 


शहरातील वाहतुकीला अडथळा होणारी वाहतूक बेटं हटवली पाहिजेत, असं खुद्द मावळत्या सभागृहाच्या महापौरांनीच स्पष्ट केलं होतं. मागच्या दोन महासभांमध्येच प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली होती. पण त्याच दरम्यान राज ठाकरे प्रचार सभांमध्ये यात वाहतूक बेटांचं जोरदार ब्रँडींग करत होते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मनसेनं शहर सुशोभीकरणाचा केवळ देखावा उभारला का?, असा प्रश्न विचारला जातोय.