नाशिकमधील अतिक्रमण मोहिम थांबवण्याचा प्रयत्न होतोय का?
डी.एस.अहिरे यांच्या लेटर हेडवर निवडणूक आयोगाकडे नाशिकच्या भंगार बाजाराचे अतिक्रमण आचारसंहितेत काढू नये अशी मागणी करण्यात आली होती.
नाशिक : शहरातील बहुचर्चित अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला आचारसंहितेची फोडणी देऊन ही मोहीम थांबविण्याच्या प्रयत्न करणारे आमदार डी.एस.अहिरे यांचे पत्र सुनियोजित कट कारस्थान असल्याची धक्कादायक माहिती झी २४ तासच्या चौकशीत समोर आलीय.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याचे आमदार डी.एस.अहिरे यांच्या लेटर हेडवर निवडणूक आयोगाकडे नाशिकच्या भंगार बाजाराचे अतिक्रमण आचारसंहितेत काढू नये अशी मागणी करण्यात आली होती.
मात्र हे पत्रच आपले नसल्याचं आमदार अहिरे यांनी स्पष्ट केले आहे. नाशिकचे भाजप आमदार बाळासाहेब सानप यांच्या स्वीय सहाय्यकाने परस्पर हे पत्र तयार करून हा खेळ खंडोबा केल्याचा आरोप आमदार अहिरे यांनी केला आहे.
दरम्यान बाळासाहेब सानप यांना झी मीडियानं फोनवरु संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणी आपला संबध नाही असं सांगत कॅमे-यासमोर बोलण्याचं टाळलं आहे.