नाशिक : नाशिक महानगरपालिकेनं थकबाकी असेलल्या मोबाईल टॉवर्स विरोधात मोहीम उघडलीय. गेल्या तीन दिवसात  प्रशासनाने २७ टॉवर्सला सील ठोकून विद्युत पुरवठा बंद केलाय. मात्र बंद केलेले काही मोबाईल टॉवर आजही कार्यान्वित असल्याने महापालिकेच्या मोहिमेचा फज्जा उडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिकेची ही कारवाई झाली असली तरी 27 पैकी बहुतांश टॉवर कार्यान्वित होते. काही ठिकाणी बॅटरी बॅकअपमुळे तर काही ठिकाणी विद्युत जोडणीमुळे टॉवर्स सुरू होते. त्यामुळे मनपाने नेमकं सील काय केलं असा प्रश्न विचारला जातोय. तसंच कंपन्यांनी कर न भरल्यामुळे जर का सेवा खंडीत झाली तर ग्राहकांनी ग्राहक पंचायतीकडे दाद मागावी असं आवाहन ग्राहक पंचायतीने केलंय.


आजवर  महापालिकेला कुठल्याही प्रकारचा कर न देणाऱ्या मोबाईल टॉवर्स उभारणाऱ्या विरोधात  केवळ महसूल वसुलीच्या दृष्टीने कारवाई केली जातेय. मात्र शहरातील अनेक टॉवर ट्रायच्या सूचनांचं उल्लंघन करून नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेत त्यांचा सर्वे करून कारवाई करण्याची मागणी होतेय.